Pages

Thursday, January 13, 2011

ते smile

न्यूयॉर्क!
असं एक शहर...खरं तर याला शहर म्हणावं का जग हा मोठा प्रश्न आहे. जिथे वेळ, गती आणि पैसा, म्हणाल तर माणसाचे अगदी जिवलग मित्र, म्हणाल तर कट्टर शत्रू, असं हे जग. इथे कोणीही, कुठेही कोणासाठीही थांबत नाही किंवा थांबूच शकत नाही. सतत पुढे चालत रहायचं, अगदी पळायचंच. एखाद्याने ठरवून सुद्धा त्याला, इथे संथपणे जगता नाही येणार. असं म्हणतात की ‘the city that never sleeps’...खरंच इथला कण अन कण सतत जागा असल्या सारखाच असतो. निरनिराळ्या प्रकारचे, निरनिराळ्या देशातले लोक इथे राहतात आणि प्रत्येकातच एक प्रचंड उर्जा तुम्हाला जाणवत असते. 

एखाद्याला जे काही हवं आहे ते सगळं काही इथे आहे आणि त्यामुळे पहिल्या भेटीतच प्रेमात पडाव असं हे शहर. कॅलेजात असल्या पासूनच तो या न्यूयॉर्क च्या प्रेमात होता. आणि असं म्हणतात ना की तुम्हाला एखाद्याला भेटायची मनापासून खूप तीव्र इच्छा असेल तर ती इच्छा कधी ना कधी नक्की पूर्ण होते. त्याचा आत्मविश्वास म्हणा किंवा त्याची इच्छा, तो आज न्यूयॉर्क मध्ये येऊन अगदी समावून गेला आहे आणि आता त्या न्यूयॉर्क ने, तिथल्या लोकांनीही त्याला आपलंस केलं आहे.

पण कधी कधी त्याला असं वाटतं की इतक्या भल्या मोठ्या शहरात तो एखाद्या भूता सारखा एकटाच फिरतोय. आजूबाजूला मोठ–मोठ्या ईमारती असूनही त्याला बऱ्याच वेळा ते सगळं एका वाळवंटा सारखंच वाटतं. त्याच्या भवती सतत गर्दी असूनही त्याला ती गर्दी बऱ्याच वेळा जाणवत नाही. लोकांचा वावर, गाड्यांचे आवाज, सबवे चे हॉर्न, त्याला काहीही जाणवत नाही. पण नियमीतपणे तो दररोज त्याच रस्त्याहून, त्याच गर्दीतून त्याचा वेळी, त्याच सबवे मधून प्रवास करत आहे. आणि आता तो इतके वर्ष इथे आहे, त्याला बरेचसे रस्ते देखील माहित आहेत. पण हे सगळं असूनही तो त्या शहरात हरवल्या सारखा झाला आहे. तो सतत वाट शोधत भटकतोय. तो काही तरी शोधतोय. सतत शोधतोय. ट्रेन मध्ये शेजारी-पाजारी असणाऱ्या प्रत्येकाकडे बघून तो एक ओळखीचा चेहरा शोधायच्या प्रयत्नात असतो. बऱ्याच वेळा ही लोकं त्याच्याशी बोलतात, कधी-कधी बघून एक स्मितहास्यही देतात, पण त्याला कळतं आहे की हे सगळ खोटं आणि कृत्रिम आहे.

खरं सांगायचं झालं तर आता त्याला सगळं काही मिळालं आहे.....आणि सगळा काही मिळतही आहे. त्याने जे ठरवले देखील नाहीये ते देखील त्याच्या आयुष्यात चांगल्या परीने येत आहे. पण तरीही तो अजूनही स्वतःला पूर्ण मानत नाहीये. का? या प्रश्नाचं उत्तर कदाचित त्यालाही माहित नाहीये. बहुतेक तो कुठल्याशा क्षणाची, कुठल्याशा गोष्टीची वाट बघतोय. पण तो क्षण कधी येणार आणि ती हवी ती गोष्ट कधी मिळणार हे ही त्याला माहित नाहीये आणि काळतही नाहीये. त्याला फक्तं इतकंच माहित आहे की काहीतरी कमी आहे आणि त्याच मुळे तो समाधानी नाहीये.

त्याच्या कडे सगळंकाही असूनही त्याला स्वतः भवती इतकी कसली कमी जाणवत आहे?

दररोज चा नाष्टा McDonalds च् बर्गर ने सुरु होतो आणि Starbucks च्या कॅफे लाटे ने संपतो. पण त्याला तो वडापाव आठवतोय. त्याला त्या टपरी वरच्या कटींग चा झुरका घ्यायचा आहे. एकीकडे David-off म्हणाल तर दुसरीकडे Marlboro, पण अजूनही त्या Classic Mild’s ने दिलेला शांतपणा, ते समाधान त्याला या सिगारेट मधून मिळत नाहीये. Jack Daniels, Absolute, Corona अगदी म्हणाल ती दारू त्याच्या हाताशी येईल, पण ती Old Monk दूर दूर पर्यंत त्याला दिसत नाहीये. त्याच्या शेजार-पाजारचे, त्याच्या ऑफिस मधले मित्र-मैत्रिणी, सगळ्यांच्यात तो अगदी मिळून-मिसळून असतो, पण त्यांच्यात तो खरा दोस्त किंवा जिगरी यार म्हणून कोणी शोधू शकत नाहीये. त्याला त्याचे नाना, कौसत्या आणि मोह्न्या हवे आहेत. घरात लॅपटोप, त्याच्या बेडरूमच्याभिंतीवर वर आई-बाबांचे, आजी-आजोबांचे फोटो आहेत, पण आता ते नुसते फोटो नसून त्यांची कमतरता त्याला जाणवायला लागली आहे.

तसं पाहिला गेलं तर ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण पूर्वी त्याचं आयुष्य यांच्यातच असायचं आणि याच गोष्टींमध्ये तो रमायचा. आणि नेमकं ह्याच सगळ्या छोट्या-छोट्या आत्ता त्याच्या बरोबर नाहीयेत आणि यांचीच कमतरता त्याला जाणवत आहे पण ते त्याच्या लक्षात येत नाहीये.

आजही तो एकटाच त्या Times Square च्या लखलखत्या प्रकाशात उभा आहे. आजही संपूर्ण शहर मोठ-मोठ्या नेओन लाईट्स, स्ट्रीट लाईट्स च्या प्रकाशात न्हाहून गेलं असूनही त्याच्या भवती त्याला नुसता अंधार जाणवत आहे.

एक माणूस येऊन त्याला फोटो काढायला सांगतो. तो माणूस, त्याची बायको आणि त्याची मुलं फोटो साठी उभे राहतात आणि हा ‘smile’ असं म्हणतो आणि फोटो काढतो.

त्याच्या आयुष्यात कमतरता आहे तर या एका ‘smile’ ची.