एक चित्र डोळ्या समोर आणा आणि मला सांगा की त्यातून तुम्हांला काय समजलं. चित्र असं आहे की सदाशिव पेठेत दोन मुली आपआपल्या गाड्यांवर बसून गप्पा मारत आहेत. एका मुलीचे नाव केतकी गोखले आणि दुसरी पूर्वा जोशी. “अगं पूर्वे that day I was sitting in Vaishali आणि हा अमित suddenly walks in म्हणजे एकदम असा माझ्या समोर येऊन उभा...I was की नाही so surprised you can’t even imagine” गोखले बाई. “आई शप्पथ! then? I mean how was it…म्हणजे you would have been अगदीच हवेत ना?” जोशी काकू. “Actually पूर्वे..actually…त्या Esquare च्या movie नंतर, I thought he would never ever meet me….but भारी ना!” गोखले बाई.
तुमच्या डोळ्या समोर जे चित्र उभं राहिलं त्यात तुम्ही, त्या मुली कशा असतील याचा विचार केला असेल हे नक्की.....साधारणपणे एक मुलगी कोथरूड सारख्या भागात राहणारी आणि दुसरी डेक्कन मध्ये राहणारी असेल. दोघेही अगदी चांगल्या मराठी कुटुंबात वाढलेल्या असणार, साधारण माध्यम वर्गीय. अगदी, मुलींचा चेहरा आणि त्यांचे एकंदर कपडे जर डोळ्या समोर आले असतील तर तुम्ही म्हणाल की एक फर्गुसनची असेल आणि दुसरी एस-पी किंवा गरवारेची. हे सगळं म्हणजे, एकंदर त्यांच्या बाह्य रूपावरून आणि बोलण्यावरून तुम्ही केलेले त्या दोन मुलीचं वर्णन. पण मला त्या मुलींच वर्णन किंवा त्याचं चरित्र-चित्रण अपेक्षित नाहीये. मला अपेक्षित आहे एक निष्कर्ष आणि तो निष्कर्ष असा आहे की “ हे आहे आजचं पुणं.”
असं म्हणतात की पुण्यात बोलली जाणारी मराठी भाषा म्हणजे अगदी खरी, अस्सल, अचूक आणि एकदम शुद्ध मराठी भाषा. वरील संभाषण ऐकल्यावर आपल्याला असं म्हणावं लागेल की कधी-काळी पुण्यात बोलली जाणारी मराठी भाषा ही खरी, अस्सल, अचूक आणि एकदम शुद्ध मराठी भाषा होती. आज ती मराठी नसून Minglish जास्त आहे आणि कारण तुमच्या समोरच आहे, वरील संभाषण.
आज पाहिलं गेलं तर दहा तरुण मुलं-मुलींपेकी किमान सात मुलं-मुली वरील संभाषण जसं आहे अगदी तशाच भाषेत बोलत असतात. त्यांच्या बोली भाषेत दर दोन मराठी शब्दानंतर चार-पाच English शब्द हे येतातच आणि महत्वाचं म्हणजे त्यात त्यांना काही गैर किंवा चूकही वाटत नसते. कारण: त्यांना त्याची सवयच झालेली असते. या सवयीचं मला उमगलेलं एक महत्त्वाचं कारण देखील आहे. हल्ली शाळेतून कॉलेजात गेल्यावर आपण खूप modern आहोत हे सगळ्या मुला-मुलींना (खास करून मुलींना)सगळ्यांना दाखवायचं हे असतंच. ह्या करता नुसतं पोशाक किंवा कॉलेज पूरक नसतं. त्यात भर पडते English बोलण्याची, English मालिका, सिनेमे बघण्याची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे English गाणी ऐकून ती सतत पाठ करून म्हणत बसणे. आणि ह्या सगळ्याची सवय इतकी लागते की खरी किंवा शुद्ध मराठी भाषा काय असते हेच त्या मुला-मुलींना माहित नसतं.
याहून आश्चर्य वाटणारी बाब ही आहे की दररोज आपण हे असं चित्र बघत असतो पण तरीही कोणालाही काहीच खुपत नाही. अशा प्रकारे बोलल्या जाणऱ्या मराठीला सुधारण्यासाठी, कोणी काही करतही नाही. मुलं सर्रास आपआपसात या minglish मध्ये बोलत असतातच, पण स्वतःच्या घरी देखील ते आपआपल्या आई-वडलांशी याच Minglish मध्ये बोलत असतात. आणि आई-वडील देखील त्यांच्या मुलांच्या या अशा भाषेला विरोध करत नाहीत. आपली मुलं या आधुनिक जगात शिक्षित आणि प्रगत व्हावीत हे सगळ्या पालकांना सहाजिकच वाटत असतं. पण या नादात या आपल्या मराठी भाषे कडे खूप प्रमाणत दुर्लक्ष होत् आहे हे त्यांना जाणवत नाही हे बघून मला त्या पालकांची कीव येते. बर त्या मुलांना त्यांच्या या अशा बोलण्याबद्दल सांगायला गेलं तर आपणच वेडे ठरतो. “ अरे चालते रे, एवढा काही फरक पडत नाही आणि तसंही मराठीतून बोललो काय आणि हे असं बोललो काय..end result एकच ना...मग chill….हे असं बोलणं आज-कालची पद्धत आहे रे “ असं उद्धट उत्तर आपल्याला ऐकावं लागतं.
आज ही परिस्थिती नुसत्या पुण्यातच आढळून येते असं नाहीये. सगळ्या मोठ्या शहरात बोलल्या जाणाऱ्या मातृभाषेला एक दुय्यम स्थान मिळालं आहे जे अत्यंत लाजिरवाणी आहे. मला हेही तेवढंच पटत् की आजच्या जगात प्रत्येक माणसाला English मध्ये अगदी व्यवस्थित बोलता हे आलचं पाहिजे. ती आजची गरजही आहे आणि English ही जगाची भाषा आहे. पण हेही तितकंच खरं आहे की आपण आपल्या मातृभाषेला English पेक्षा कमी लेखून अनादर करू नये, किंवा दुर्लक्षही करू नये. उगाच जगाला आपण किती प्रगत आहोत, किंवा किती “Modern” आहोत हे दाखवण्याकरता अशा Minglish भाषेत जर आपण बोलत असलो तर त्याला काही अर्थ नाहीये. तो निव्वळ वेगळं चेहरा चढवण्यासारखं किंवा मुद्दाम आव आणण्यासारखं आहे.
आज एखाद्या English medium मधील मुला-मुलीला त्यांची मातृभाषा काय आहे हे विचारा, उत्तर न मिळता एक प्रश्न तुम्हांला समोरून ऐकू येईल की “मातृभाषा म्हणजे काय?”....मग त्यांना विचार की “तुझी Mother tongue काय आहे?” आणि मग लगेच उत्तर मिळेल.