दिवाळी उलटून एक आठवडाच झाला होता. अमेरिकेत
असल्यामुळे मला ती दिवाळी असून नसल्या सारखीच होती. पण बोस्टन मध्ये खास
दिवाळी निम्मित एका
महत्वाच्या कार्यक्रमाचा प्लान आधीच फायनल
झाला होता. आम्ही सगळे अगदी आवर्जून जाणार होतो, पण मग काही
कारणामुळे बरेचजण गळाले आणि शेवटी एकला चलो रे’ आणि ‘एक बार जो मैने कमीटमेंट कर
लिया तो मै खुद की भी नही सुनता हु’ ही वाक्य रिपीट मोड मध्ये ऐकून उत्साहाच्या भरात घरा
बाहेर पडलो आणि गाडी बाहेर काढली. संध्याकाळ पासूनच मला खूप भूक लागली होती पण मी
त्या भुकेला मुद्दाम तरंगत ठेवले होते. कारणच तसे होते. इथल्या एका इंडिअन हॉटेल
मध्ये ‘मुंबई मसाला’ अशी थीम होती. अशी थीम असल्यामुळे आपल्या पदार्थांबरोबर
बोस्टनच्या खूप मराठी मंडळीचे दर्शन घडणार, यामुळे माझा उत्साह खूप दांडगा होता. मी
दुपारीच मेनू बघून ठेवला होता. पाव भाजी म्हणू नका, भेळ-पाणी पुरी म्हण नका, कच्ची
दाबेली म्हणू नका किंवा मिसळ पाव म्हणू नका. या सगळ्या मेनू मधून काय खायचे यातच
माझा ऑफिस मधला शेवटचा एक तास गेला होता, पण त्यातल्या त्यात मिसळ पाव वर ताव
मारायचा असे मी मनात पक्के केले होते. असो, तर मी गाडी काढली आणि चटकन त्या हॉटेल
पाशी गेलो. म्हणावी तितकी गर्दी दिसत नव्हती, पण तरी लाईन मध्ये थांबावे लागले.
दाराच्या आत शिरताच तो पूर्ण सुगंध प्रत्येकाचे स्वागत करत
होता आणि आम्हा लोकांना अगदी ‘अवधूत गुप्ते’ च्या भाषेत म्हणायचे झाले तर ‘त्रास’
देत होता. त्याहून त्रास म्हणजे टेबल वर बसलेले लोक. त्यांच्याकडे अक्षरश: बघवत
नव्हते. एक-एक जण अगदी ३ दिवस उपाशी राहून त्या डीशेस वर ताव मारत आहे, असे ते
चित्र होते. मी लाईन मधल्या बाकी लोकांच्या प्रमाणे वाट बघत थांबलो होतो. कडेच्या
टेबल वर बडीशेप ठेवली होती. जरा वेळाने ती खाऊनही कंटाळा आला. त्यानेच भूक मारेल,
अशी एक क्षण भीती देखील वाटली.
जरा वेळाने लोकांना कंठ फुटला. “काय ना! लोक उठत
का नाहीयेत? आयला खावे म्हणजे किती खावे त्याला काही सुमार”, “अबे बस भी कर, पेट
फट जाएगा”, “हा समोरचा बघ, त्याचा सातवा गुलाब जाम चालू आहे” असे नीर-निराळ्या
सुरातले आवाज कानावर येत होते. कसे होते, आता ते लोक बोलत नसून त्यांची पोट
बोलायला लागली होती. भयंकर भूक लागणे आणि भयंकर भूक लागून त्या भुकेला तिष्टत ठेवणे
म्हणजे काय, ते आज अनुभवायला मिळाले. तितक्यात “गुलाब जाम जरा जास्तच गोड आहेत
नाही? बर तेवढे उठलीस की अजून दोन घेऊन ये” असे त्या सात गुलाब जाम हाणलेल्या
माणसाने म्हटलेले मी आणि लाईन मध्ये उभे राहिलेल्या लोकांनी ऐकले. त्याला
बघितल्याखेरीज माझे काही समाधान होणार नाही असा विचार माझ्या मनात
यायच्या आधीच एकाने स्व-उमेदवारी जाहीर करत ‘भ’ अक्षराने सुरु होत असलेल्या किमान
५-६ विशेषणांनी त्या गुलाब जाम खाणाऱ्याला सन्मानित केले.
जरावेळाने लाईनीत थांबलेल्या लोकांना टेबल
मिळायला सुरवात झाली आणि मग ते चैतन्याचे वातावरण पुन्हा रजू होऊ लागले. मागून एका
तरुणाचा आवाज ऐकू आला. “अरे यार यहापे बहुत टाईम लगने वाला है, एक काम करते है कही
दुसरी जगह जाते है”. या त्याच्या वाक्याला एकदम पुणेरी उत्तर मिळाले. त्याच्या
बरोबर असलेली त्याची मैत्रीण जी पुण्याचीच होतो, ती म्हणाली “अरे ये लाईन कुछभी
नही है. हमारे वेशाली मे ये लाईन सिर्फ एक ट्रेलर है, अरे इतने देर तक रुकना पडता
है की बोल मत, और हम रुक्त हे, ऐसा कलटी नही मारते. चल तब तक ये बडीशेप की गोळी
खाते है”. तिचा पुण्याच्या जाज्वल्य अभिमान, तिचे ते टिपिकल पुणेरी हिंदी, त्यातून
‘चल तब तक ये बडीशेप की गोळी खाते है’ मधून बाहेर येणारा पुणेरीपणा, असे ते सगळे
ऐकून माझ्यात थोडी उर्जा आली होती. मनातल्या मनात मीच माझ्या पाठीवर थाप देत
म्हणालो “ आहे..कोणीतरी आपल्यातले आहे”. पण मग त्याचबरोबर ‘वेशाली’ हा शब्द आठवला
आणि डोक्यात एक तिडीक भरली. “अरे हे मराठी लोक सुधा ‘वेशाली’ का म्हणतात?” आणि
त्यातून पुण्याची, चांगली, सुंदर मराठी मुलगी(अर्थात मी मागे वळून तिचा चेहरा
पहिला नव्हता, पण आवाजावरून अंदाज बांधला, तशी सुंदरच असणार ती) आणि तिच्या तोंडून
‘वेशाली’? नाही, विषयच संपला. आज माझ्या फोन मध्ये तो ‘अब तक छप्पन’ मधला नानाचा
डायलोग असता तर मी तो फुल वोल्युम मध्ये त्याच क्षणी लावला असता, असा एक
क्रांतिकारी विचार माझ्या मनात बराच वेळ ठक-ठक करत होता.
हळू हळू मी लाईनीत पुढे जात होतो. समोर बसलेला
गुलाब जाम वीर अजूनही गुलाब जाम खाण्यात मग्न होता. काही वेळाने गुलाब जामाशी खेळायला
देखील सुरुवात झाली होती. वाटीतला एक गुलाब जाम त्याने अर्धा केला, त्यानंतर तो
त्याने पुन्हा पाकात बुडवला आणि इतके करून सुद्धा खाल्लाच नाही. त्याच्याकडे फक्त
बघत बसला होता. त्याचवेळी दुसरा हात पोटावरून फिरवत कदाचित त्याने त्त्याच्या
पोटात कितपत जागा आहे हे चेक केले. शेवटी त्याची बायको टेबलावरून उठली आणि तिची
पर्स हातात घेतली. स्वाभाविकपणे ह्याला उठावेच लागले, पण ते टेबल आणि तो गुलाब जाम
त्याला सोडवतच नव्हते. तसाच पडलेला चेहरा ठेऊन तो उठला आणि एकदाचा गेला आणि मग मला
बसायला जागा मिळाली. सुटकेचा निश्वास!
कसे असते बघा, काही गोष्टी एकदम ओटोमेटीक सुचतात.
मला कधी-कधी नवलच वाटते या बद्दल. तसा अलिखित नियमच म्हणा, सगळ्यात पहिले मी
खुर्चीवर माझा स्कार्फ टाकला म्हणजे कसे ‘हे टेबल आधीच राखीव आहे’ असा बोर्ड
त्यावर लागतो. स्कार्फ ठेवून थेट जेवणाचे ताट हातात घेतले. २
बटाटे वडे, वाटीभर मिसळ, २ जोडी पाव (विदाउट बटर, बटरवाले पाव ते पाव भाजीचे असा
माझ्या मनात मीच बिंबवून घेतले आहे) आणि श्रीखंड (पहिल्यांदाच? असा ज्यांना प्रश्न
पडला असेल त्यांना मी ‘हो!’ एवढेच उत्तर देऊ इच्छितो), असे सगळे घेऊन मी बसलो आणि
त्या अन्नाचा आस्वाद घ्यायला मी शुभारंभ केला. जग जिंकल्याचे फिलिंग! सर्वात
पहिले वडा घशात गेला आणि सुख काय असते ते पुन्हा एकदा अनुभवले. त्यानंतर मिसळीचा
नंबर होता. अपेक्षे प्रमाणे मिसळ एकदम फक्कड होती. बोस्टन मध्ये अस्सल मराठमोळी
मिसळ! वाः,कमाल, बेस, खराब असे अलंकारित शब्द देखील फिके पडत होते. कुठून तरी ‘एक
घास चिऊचा, एक घास काउचा आणि एक घाssssssssस आमच्या पिल्लूचा”
असे शब्द कानावर पडत होते, पण ते फक्त पडतच होते. माझी मान, माझे डोके, माझे डोळे,
माझे तोंड, माझे हात, एकूणच माझे पूर्ण लक्ष टेबल वर ठेवलेल्या ताटात होते. कानाचे
कसे आहे की ते एकंदर जागे असतात, इकडचे तिकडचे ऐकायची त्यांना सवय आहे.
सेकंड राउंड साठी मी उठलो पण यंदा मात्र मिसळ, २
पाव आणि श्रीखंड एवढेच परत घेऊन आलो. तेवढ्यात पुन्हा एकदा “अरे अथर्व, हे बघ don’t stand
and eat, इकडे बस and then eat nicely. अथर्व, ए अथर्व are you
listening, मी काय सांगत आहे?”. हा तोच ‘एक घास चिऊ” वाला आवाज होता. आता मात्र
मी आवाजाच्या दिशेने पहिले, पाहावेच लागले कारण ते ऐकू आलेले वाक्यच तसे होते.
अथर्वची आई अगदी टिपिकल होती. जीन्स, गॅपचा हुडी ज्यातून ते अगदी छोटेसे मंगळसूत्र
मुद्दाम बाहेर काढले होते आणि कपाळावर टिकली. तितक्यात वेगळ्या सुरातला अजून एका
मुलीचा आवाज ऐकू आला. कमी वोल्युम मध्ये बोलणे चालू होते. “हेच, याचमुळे ही मुले
इंग्लिश बोलायला लागतात आणि मराठी विसरतात. पालकच जर आपल्या मुलांशी असे बोलत
असतील तर मुलांनी तरी विचारावे कोणाला, नाही सांग तू”. माझ्या आतून पुन्हा एकदा
तोच आवाज “आहे, खरेच आपल्या सारखे कोणीतरी आहे!“ पुन्हा तिचा आवाज “आणि राज ठाकरे
काही बोलला तर त्याला शिव्या घालतात पण मुद्दा काय आहे ते कोणीच बघत नाही, नाही
संगच तू बरोबर आहे का नाही?” मी मनातल्या मनात “हो मुली, अगदी बरोबर आहे तुझे.
तुझ्या विचारांना १०० पेकी १००. पण कसे आहे ना सध्या मी खाण्यात व्यस्त आहे आणि ते
फार महत्वाचे आहे नाहीतर तुझ्या या वाक्याला मी नक्कीच अजून एक वाक्य जोडले असते
पण सध्या ते शक्य नाहीये. प्लीज समजून घे”. जरा वेळाने माझे ताट साफ झाले आणि मग
शांतपणे खुर्चीला टेकत मी आजूबाजूला एक नजर टाकली. माझ्याच सारखे कैक भुक्कड,
खादाड लोक तिथे बसून त्या ‘मुंबई मास्लाल्यावर’ बेधुंद ताव मारत होते. का कोणास ठाऊक
पण त्यांच्याकडे बघून मला एक समाधान वाटले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेग-वेगळ्या
भाव मुद्रा होत्या पण त्यात एक समान गोष्ट अशी होती की सगळे खूप आनंदात दिसत होते.
निम्म्याहून जास्त मराठी लोक परदेशात एका छताखाली एकत्र जेवत आहेत हे फिलिंग थोडे वेगळेच
होते. मागच्या बाजूला त्या पुणेरी मुलीचे तिच्या मित्राला “तुम ये चायनीज भेळ
ट्राय करो ना, और वो मसाला दूध भी लेके आओगे प्लीज” असे उपदेश कम आदेश कम मागणी
चालू होती. मराठी अस्मिता जपणाऱ्या मुलीला बोलता बोलता कदाचित ठसका लागला होता
म्हणून तिचा मित्र तिला पाणी शांतपणे प्यायला सांगत होता. ते पाणी पिताना देखील
तिला काहीतरी बोलायचे होते पण “अग २ मिनिट शांतपणे श्वास घे आणि मग बोल” असे
सांगून तिला शांत करण्याच्या प्रयत्नांत होता. इकडे अथर्वचे अजूनही उभे राहूनच
जेवण चालू होते. एका हातात ते अन्न, ज्यातले अर्धे खाली सांडत होते आणि दुसर्या
हातात त्याची पाण्याची बाटली आणि ह्याचे लक्ष्य भालतीकडेच आणि त्या अथर्वच्या आईचे
भाषेचे नव-नवीन प्रयोग चालूच होते. असे एकंदर नुसते विविध मसाल्यांचे पदार्थ नसून
तिथे विविध मसाल्यांचे लोक देखील होते.
अरे हो, मसाला दूध विसरलोच की. आलोच घेऊन! ;)