परवा नेहमी प्रमाणे ओफिसला गेल्या नंतर
चहा घेऊन NDTV वरच्या
बातम्या वाचत बसलो होतो. काही दिवसांपूर्वी घडलेल्या त्या घटनेबद्दल मी वाचले
होतेच पण खरे सांगायचे झाले तर ती एक निव्वळ बातमी म्हणून. तेंव्हा देखील राग हा
आलाच होता, त्या मुली बद्दल सहानभूती, दया आणि कळवळ वाटली होती, पण ती तेवढ्याच
पुरती. दिवस संपला, बातमीचा विसरही पडला. पण परवा त्या मुली बद्दल संपूर्ण वाचले.
तिच्या बरोबर काय घडले, कसे घडले, तिच्यावर झालेले पाचवे ऑपरेशन , तिचे वडील तिला ICU मध्ये बघायला का गेले नाहीत कारण
त्यांना तिची ही झालेली शारीरिक अवस्था अक्षरश: बघवत नव्हती. तिला जे म्हणायचे
होते, ते ती, पोलिसांना, तिच्या आईला आणि डॉक्टरांना त्या अर्धमेल्या हाताने लिहून
सांगत होती. असे संपूर्ण वर्णन परवाच्या बातमीत वाचले आणि तेंव्हा त्या घटनेचे,
त्या मुलीची शारीरिक आणि मानसिक अवस्थेची खरी तीव्रता कळली. अंगावर काटा आला आणि
डोळे ओले झाले. राग देखील खूप आला, खूप वाईटही वाटले पण स्वतः बद्दल. खरेच आपल्याला
या अशा घटनांची इतकी सवय झाली आहे का, की ती निव्वळ एक बातमी होऊन जाते? खरेच आपण
इतके निगरगट्ट झालो आहोत की अशा बातम्या वाचूनही आपल्याला फक्त एक वर-वरची आणि
पोकळ सहानभूती वाटते, आणि ती तितक्याच सहज रित्या मरूनही जाते? परवाच एका मित्राने लिहिले मी वाचले, ‘सगळ्यांच्या
भावना नाजूक झाल्या आहेत,
लगेच दुखावतात पण संवेदनशील कोणीच राहिलेलं नाही.’ मी, माझा परिवार, मित्र मंडळी आणि हेच माझे
जग, एवढेच राहिले आहे का? आपली मने इतकी मेली आहेत का? आणि तसे जर झाले असेल तर त्यासारखे
दुर्दैवी काहीच नाही. ते म्हणतात ना, की काही प्रश्नांना नुसती उत्तरे देऊन ते
प्रश्न सुटत नाहीत. उत्तरांच्या पलीकडे एक जग आहे ते कळायला हवे.
निव्वळ एक निमित्त झाले....
जे व्हायचे ते होऊन गेले...कृती घडायची
ती घडून गेली..
चर्चा पुन्हा सुरु
झाली...मंत्र्या-संत्र्यांच्या तोंडाला वाचा फुटली...
लोकांना उधाण आले...एक नवीन उमेद एक
नवीन आशा..
काही दिवस लोटून गेले......
सगळेच शांत...सगळेच धुसर...
आणि पुन्हा एकदा एक नवीन कृत्य.
चर्चा मात्र तीच, तोंडे
देखील तीच, वाचा सुद्धा तीच अन उधाण ही तेवढेच...
ते मदतीचे हात फक्त दाखवण्याकरिता...आश्वासनाचा
सूर ही पोकळ..
सगळेच शांत...सगळेच धुसर...
खरंच...जे व्हायचे ते होऊन गेले..
केवळ एक निमित्त झाले...
2 comments:
Wa, End awadala! Pratyekachya manatala, words madhe lihila ahes. KHup diwsani Social subject war lihilas ya weli. Like it.
Very nice start with beautiful end of of very sensitive subject....very well presented wa.... like it so much.....Keep it up
Post a Comment