Pages

Friday, May 17, 2013

आठवणीतले अनोळखी चेहरे!


‘पु.ल’ ऐकल्यावर मला माझा पुण्याच्या ऑफिसला जायचा प्रवास डोळ्यासमोर येतो. मित्राची कार, जुना मुंबई-पुणे हायवे आणि ‘पु.ल’. स्ट्रोबेरी शेक बरोबर युनिवेरसीटीतले उन्हाळ्याचे दिवस, उसाचा रस जोडला जातो ‘शैलेश’ला आणि ‘शैलेश’ जोडले जाते शाळेतला शनिवाराला. अशा असंख्य आठवणी एखादा प्रसंग, एखादी जागा, एखादी व्यक्ती किंवा एखादा चेहरा अशा पुष्कळशा गोष्टीशी जोडल्या गेल्या असतात. या सगळ्याशी आपले एक नाते असते त्यामुळे त्या आठवणींमध्ये एक आपलेपणा असतो. पण काही आठवणी अशा असतात ज्यांच्याशी आपले अगदी काही संबंध देखील नसतो न काही नाते असते. त्या आठवणींमध्ये बर्याचदा काही अनोळखी चेहर्यांचा सहभाग असतो आणि ते चेहरे आपल्या लक्षात राहतात. खरेतर त्या आठवणी पेक्षा ते चेहरेच वेळो वेळी आपले अस्तित्व या ना त्या मार्गाने जागे करत असतात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
त्या दिवशी तुफान पाउस. दररोजच्या रस्त्यावर गाडी चालवत असून देखील माझी तारांबळ उडली होती. जोरदार झोडपणारा पाउस, त्याहून जास्त वाऱ्याचा वेग, गाडीत बर्यापेकी मोठ्या आवाजात लावलेले गाणे आणि अचानक वाजणारा माझा फोन असे सगळेच एकाच वेळी हाताळणे म्हणजे थोडी कसरत करावी लागणार असे मला जाणवत होते. मी गाडीचा वेग कमी केला, गाडी कडेच्या लेन मध्ये घेतली आणि गाण्याचा आवाज कमी करणार तेवढ्यात फोन वाजायचा थांबला होता. अननोन नंबर होता. पाउसाचा जोर अजून वाढला. मी गाण्याचा आवाज कमी केला, फोन पुन्हा वाजला, फोन मधला आवाज व्यवस्थित ऐकू येत नव्हता. मी ‘हेलो हेलो’ म्हणत होतो आणि एकीकडे गाडी चालवत होतो. तेवढ्यात समोरून कोणीतरी चालत येताना दिसले. गाडीच्या काचेवर आदळणारा पाउस आणि वाइपर यांच्या पलीकडे एक बाई छत्री घेऊन उभी आहे असे खूप भुरकटसे दिसत होते. तशी ती खूप लांब होती. १-२ पाउल ती पुढे येताना दिसायची पण परत थोडे मागे जायची. असे तिचे बराच वेळ पुढे मागे चालले होते. जस-जशी  माझी गाडी जवळ जायला लागली ती बाई बऱ्यापेकी मला दिसायला लागली होती. रस्त्याच्या कडेला तळे तयार झाले होते. गाड्या वेगात असल्यामुळे रस्त्यावरचे पाणी सगळे फुटपाथवर आणि तिच्या अंगावरही उडत होते आणि ती स्वतःला त्या उडत असलेल्या पाण्यापासून वाचवायचे खूप प्रयत्न करत होती असे माझ्या लक्षात आले. माझी गाडी तिच्या जवळ यायला लागली होती. ती हातवारे करून ‘पुढे खूप पाणी आहे आणि ते माझ्या अंगावर उडत आहे. गाडी हळू चालवा’ असे खुणवत होती हे मला दिसले पण गाडी तिच्या बऱ्यापेकी जवळ आली होती. तिने त्याक्षणी पाणी न उडण्याच्या सगळ्या अशा सोडून दिल्याचे माझ्याही लक्षात आले होते. मी तितक्यात, झटकन ब्रेक दाबला. तिने पाणी अडवण्याकरिता आपली छत्री खाली घेतली होती. मी जोरात ब्रेक दाबल्यामुळे गाडी त्याच जागी एकदम थांबली, तिच्या अंगावर पाणी उडले नव्हते पण जोरदार पडत असलेल्या पावसामुळे ती ओली चिंब झाली होती. मागच्या गाड्या होर्न मारत, शिव्या देत निघून जात होत्या. ती एक क्षण थांबली. आम्ही दोघांनी एक-मेकांकडे पहिले. एक क्षण पूर्ण शांतता. मला तेंव्हा न त्या पावसाचा आवाज ऐकू येत होता, न त्या वाइपरचा. ‘thank you’ असे तीने मला म्हटलेले दिसले आणि एक क्षण थांबून पुन्हा ‘sorry’ असेही ती मला म्हणाली. अर्थात मला एक अक्षरही ऐकू आले नाही. मी तिच्या चेहऱ्याकडे निर्विकार पणे बघत बसलो होतो. मी काही तरी बोलेन या अपेक्षेने ती तिथे थांबली होती असे मला वाटले पण मी भानावर येणार तेवढ्यात ती निघून गेली होती. मी गाडीत, मागे वळून मागच्या काचेतून तिला बघण्याचे खूप प्रयत्न केले पण पावसामुळे ती मला दिसली नाही आणि जरा वेळानंतर ती नाहीशी झाली होती. अशा पावसात भिजलेले, ओल्या चिंब झालेले कित्त्येक लोक माझ्या बघण्यात येतात पण मला कधीच त्यांचे चेहरे लक्षात राहिले नाहीयेत, पण तिचा चेहरा मात्र अगदी तासाचा तसा माझ्या डोळ्या समोर उभा राहतो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अशीच नुकतीच गाडी चालवायला सुरुवात केली होती. बर्फाचे दिवस होते. आतल्या आणि छोट्या रस्त्यावर मी होतो. मी गाडी चालवण्यात अगदीच नवखा आणि त्यातून प्रचंड बर्फ पडून गेला होता. रस्त्यावरचा बर्फ अजूनही पुष्कळशा प्रमाणत तसाच होता आणि गोठायला लागला होता. तापमान शून्याच्या खाली. रस्त्यावर बर्फ असल्यामुळे गाडी थोडीफार घसरत होती. अचानक ट्राफिक सुरु झाला. त्या आतल्या रस्त्याव अचानक ट्राफिक असण्याचे काहीच कारण नव्हते. १ मैल अंतर गाठायला मला जवळ जवळ अर्धा तास लागला होता. गाड्या अगदी मुंगीच्या वेगाने पुढे जात होत्या. मला अक्षरश: वैताग यायला लागला होता. बाहेर पाहिले तेंव्हा थोड्या थोड्या अंतराने शाळेतली मुले जाताना दिसायची. कदाचित जवळ पास शाळा होती आणि त्याचमुळे तो ट्राफिक जाम होता, हे माझ्या ध्यानात आले. इथे अमेरिकेत प्रत्येक शाळेच्या जवळ २५ मैलचे स्पीड लिमिट असते आणि प्रत्येकजण हे कटाक्षाने पाळतो. कदाचित ‘पाळतो’ म्हणणे देखील चुकीचे आहे कारण हे त्यांच्या रक्तातच आहे. समोर एक चौक दिसत होता आणि त्या पुढे गाड्या व्यवस्थित वेगाने जाताना दिसत होत्या. तेवढ्यात एक म्हतारेसे गृहस्थ समोर येऊन पाठ करून उभे राहिले. त्यांच्या हातात लाल रंगाचा मोठा बोर्ड दिसत होता. अंगावर फ्लोरोसेंट रंगाचे जर्किन होते. त्या एवढ्या थंडीत ते एकटेच तिथे तो संपूर्ण ट्राफिक सांभाळत होते. गाडी जशी जशी चौकाजवळ गेली तसे ते आजोबा मला व्यवस्थित दिसायला लागले. चेहऱ्यावर सुरकुत्या आणि त्या भयानक थंडीमुळे त्यांचा चेहरा, त्यांचे कान गुलाबी रंगाचे झाले होते. डोक्यावर न कानटोपी न त्या हातात मोजे. वारे देखील चांगले वाहत होते आणि त्यामुले थंडी सुद्धा चांगलीच लागत असणार पण तरीही ते आजोबा तिथे एकटेच खिंड लढविल्या प्रमाणे सगळे सांभाळत होते. काही वेळाने माझ्या लक्षात आले की ते नुसते ट्राफिक सांभाळत नसून समोर असलेल्या शाळेतल्या मुलांना रस्ता क्रोस करण्याकरता मदत करत होते. मधूनच त्यांचा त्या बर्फामुळे पाय घसरायचा, मुले त्यांच्याकडे बघून हसायची मग ते आजोबा सुद्धा त्या मुलांच्या करमणुकीसाठी अजून आव आणायचे, मिश्कील हसायचे आणि ती मुले पुन्हा हसायची. असे ते सगळे चित्र होते पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे करताना देखील त्यांचा चेहऱ्यावर सतत उत्साह दिसत होता. थंडी आणि वार्यामुळे मधूनच ते त्यांचा एक हातात खिशात घालताना दिसायचे. तेवढीच त्यांच्या हातांना उब मिळत असावी. मी अगदी चौकात जाऊन पोचलो होतो आणि एक भला मोठा मुलांचा लोंढा समोर येऊन थांबला होता. माझ्याकडच्या लेन मधल्या गाड्यांना त्यांनी थांबवले आणि “Just give me 2 seconds and I will pack those bunch of kids” असे ते म्हणाले आणि समोर चालत गेले. तिकडे गेल्यावर जवळ जवळ प्रत्येक मुलाला “hey there…how is it going kid…hello..have a nice one!” अशा वाक्याने स्वागत करताना दिसत होते. ते सगळे बघून मला स्वतःलाच खूप मस्त वाटले. एकीकडे एकट्याने ते पूर्ण ट्राफिक सांभाळणे, कडकडीत थंडी, रस्त्यावर बर्फ आणि त्या माणसाचा तो हसरा चेहरा, त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह सगळे अगदी विलक्षण होते. तिथून निघताना मी अगदी मनापासून ‘thank you’ असे त्यांना म्हणालो, ते माझ्याकडे बघून हसले आणि मी तिथून पुढे निघून गेलो. त्या एका माणसाच्या उत्साहामुळे माझ्या सारख्या कित्त्येक जणांचा दिवस चांगला जात असेल असा विचार माझ्या मनात येऊन गेला. काही दिवसानंतर मला कळले की इथे अमेरिकेत बरेच ज्येष्ठ नागरिक स्वताहून अशा शाळे लगतच्या रस्त्यावर ‘traffic volunteering’ करता पुढाकार घेतात. त्यानंतर मला बर्याचशा शाळे जवळ असे आजी-आजोबा दिसत गेले. प्रत्येक चेहरा मी अगदी जवळून बघण्याचा प्रयत्न करत असतो पण कधी त्या आजोबांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद, मला बाकीच्या चेहर्यांमध्ये दिसला नाहीये.

ती पावसातली मुलगी म्हणा किंवा ते ट्राफिक सांभाळणारे आजोबा म्हणा, यांच्याशी माझे काहीच नाते नव्हते. पण तरी कधी गाडी चालवत असताना पावसाने झोडपले किंवा एखाद्या शाळे जवळून मी कधी गेलो की मला आपोआप तो चेहरा डोळ्या समोर येतो. बर असेही नाही की त्या चेहर्यांमध्ये काही वेगळे किंवा न पाहिलेले आणि न विसरणारे भाव होते. ते चेहरे मला त्या नंतर प्रत्यक्षात कधी दिसले देखील नाहीत, पण तरी असे काही विशिष्ठ चेहरे आपोआप डोळ्यासमोर का येतात ह्या मागचे कारण मला कधीच कळेल नाहीये. एवढे मात्र नक्की की ते चेहरे डोळ्यासमोर येतात आणि मग त्या आठवणी जाग्या होतात.­­­ या आठवणीत एक निराळीच गम्मत असते. न ती व्यक्ती ओळखीची, न त्या प्रसंगाशी काही संबंध. आपण एका प्रेक्षकासारखे त्या पूर्ण गोष्टीत असतो पण तरीही ती गोष्ट आपल्याभावतीच फिरत असते असे काही ते समीकरण असते.    

Thursday, January 31, 2013

निव्वळ एक निमित्त झाले...


परवा नेहमी प्रमाणे ओफिसला गेल्या नंतर चहा घेऊन NDTV वरच्या बातम्या वाचत बसलो होतो. काही दिवसांपूर्वी घडलेल्या त्या घटनेबद्दल मी वाचले होतेच पण खरे सांगायचे झाले तर ती एक निव्वळ बातमी म्हणून. तेंव्हा देखील राग हा आलाच होता, त्या मुली बद्दल सहानभूती, दया आणि कळवळ वाटली होती, पण ती तेवढ्याच पुरती. दिवस संपला, बातमीचा विसरही पडला. पण परवा त्या मुली बद्दल संपूर्ण वाचले. तिच्या बरोबर काय घडले, कसे घडले, तिच्यावर झालेले पाचवे ऑपरेशन , तिचे वडील तिला ICU मध्ये बघायला का गेले नाहीत कारण त्यांना तिची ही झालेली शारीरिक अवस्था अक्षरश: बघवत नव्हती. तिला जे म्हणायचे होते, ते ती, पोलिसांना, तिच्या आईला आणि डॉक्टरांना त्या अर्धमेल्या हाताने लिहून सांगत होती. असे संपूर्ण वर्णन परवाच्या बातमीत वाचले आणि तेंव्हा त्या घटनेचे, त्या मुलीची शारीरिक आणि मानसिक अवस्थेची खरी तीव्रता कळली. अंगावर काटा आला आणि डोळे ओले झाले. राग देखील खूप आला, खूप वाईटही वाटले पण स्वतः बद्दल. खरेच आपल्याला या अशा घटनांची इतकी सवय झाली आहे का, की ती निव्वळ एक बातमी होऊन जाते? खरेच आपण इतके निगरगट्ट झालो आहोत की अशा बातम्या वाचूनही आपल्याला फक्त एक वर-वरची आणि पोकळ सहानभूती वाटते, आणि ती तितक्याच सहज रित्या मरूनही जाते? परवाच एका मित्राने लिहिले मी वाचले, ‘सगळ्यांच्या भावना नाजूक झाल्या आहेत, लगेच दुखावतात पण संवेदनशील कोणीच राहिलेलं नाही.’ मी, माझा परिवार, मित्र मंडळी आणि हेच माझे जग, एवढेच राहिले आहे का? आपली मने इतकी मेली आहेत का? आणि तसे जर झाले असेल तर त्यासारखे दुर्दैवी काहीच नाही. ते म्हणतात ना, की काही प्रश्नांना नुसती उत्तरे देऊन ते प्रश्न सुटत नाहीत. उत्तरांच्या पलीकडे एक जग आहे ते कळायला हवे. 

निव्वळ एक निमित्त झाले....
जे व्हायचे ते होऊन गेले...कृती घडायची ती घडून गेली..
चर्चा पुन्हा सुरु झाली...मंत्र्या-संत्र्यांच्या तोंडाला वाचा फुटली...
लोकांना उधाण आले...एक नवीन उमेद एक नवीन आशा..
काही दिवस लोटून गेले......
सगळेच शांत...सगळेच धुसर...
आणि पुन्हा एकदा एक नवीन कृत्य.
चर्चा मात्र तीच, तोंडे देखील तीच, वाचा सुद्धा तीच अन उधाण ही तेवढेच...
ते मदतीचे हात फक्त दाखवण्याकरिता...आश्वासनाचा सूर ही पोकळ..
सगळेच शांत...सगळेच धुसर...
खरंच...जे व्हायचे ते होऊन गेले..
केवळ एक निमित्त झाले...

Friday, January 18, 2013

खादाडांच्या दुनियेतली एक मराठ्मोळ संध्याकाळ...


दिवाळी उलटून एक आठवडाच झाला होता. अमेरिकेत असल्यामुळे मला ती दिवाळी असून नसल्या सारखीच होती. पण बोस्टन मध्ये खास दिवाळी निम्मित एका महत्वाच्या कार्यक्रमाचा प्लान आधीच फायनल झाला होता. आम्ही सगळे अगदी आवर्जून जाणार होतो, पण मग काही कारणामुळे बरेचजण गळाले आणि शेवटी एकला चलो रे’ आणि ‘एक बार जो मैने कमीटमेंट कर लिया तो मै खुद की भी नही सुनता हु’ ही वाक्य रिपीट मोड मध्ये ऐकून उत्साहाच्या भरात घरा बाहेर पडलो आणि गाडी बाहेर काढली. संध्याकाळ पासूनच मला खूप भूक लागली होती पण मी त्या भुकेला मुद्दाम तरंगत ठेवले होते. कारणच तसे होते. इथल्या एका इंडिअन हॉटेल मध्ये ‘मुंबई मसाला’ अशी थीम होती. अशी थीम असल्यामुळे आपल्या पदार्थांबरोबर बोस्टनच्या खूप मराठी मंडळीचे दर्शन घडणार, यामुळे माझा उत्साह खूप दांडगा होता. मी दुपारीच मेनू बघून ठेवला होता. पाव भाजी म्हणू नका, भेळ-पाणी पुरी म्हण नका, कच्ची दाबेली म्हणू नका किंवा मिसळ पाव म्हणू नका. या सगळ्या मेनू मधून काय खायचे यातच माझा ऑफिस मधला शेवटचा एक तास गेला होता, पण त्यातल्या त्यात मिसळ पाव वर ताव मारायचा असे मी मनात पक्के केले होते. असो, तर मी गाडी काढली आणि चटकन त्या हॉटेल पाशी गेलो. म्हणावी तितकी गर्दी दिसत नव्हती, पण तरी लाईन मध्ये थांबावे लागले. दाराच्या आत शिरताच तो पूर्ण सुगंध प्रत्येकाचे स्वागत करत होता आणि आम्हा लोकांना अगदी ‘अवधूत गुप्ते’ च्या भाषेत म्हणायचे झाले तर ‘त्रास’ देत होता. त्याहून त्रास म्हणजे टेबल वर बसलेले लोक. त्यांच्याकडे अक्षरश: बघवत नव्हते. एक-एक जण अगदी ३ दिवस उपाशी राहून त्या डीशेस वर ताव मारत आहे, असे ते चित्र होते. मी लाईन मधल्या बाकी लोकांच्या प्रमाणे वाट बघत थांबलो होतो. कडेच्या टेबल वर बडीशेप ठेवली होती. जरा वेळाने ती खाऊनही कंटाळा आला. त्यानेच भूक मारेल, अशी एक क्षण भीती देखील वाटली.  

जरा वेळाने लोकांना कंठ फुटला. “काय ना! लोक उठत का नाहीयेत? आयला खावे म्हणजे किती खावे त्याला काही सुमार”, “अबे बस भी कर, पेट फट जाएगा”, “हा समोरचा बघ, त्याचा सातवा गुलाब जाम चालू आहे” असे नीर-निराळ्या सुरातले आवाज कानावर येत होते. कसे होते, आता ते लोक बोलत नसून त्यांची पोट बोलायला लागली होती. भयंकर भूक लागणे आणि भयंकर भूक लागून त्या भुकेला तिष्टत ठेवणे म्हणजे काय, ते आज अनुभवायला मिळाले. तितक्यात “गुलाब जाम जरा जास्तच गोड आहेत नाही? बर तेवढे उठलीस की अजून दोन घेऊन ये” असे त्या सात गुलाब जाम हाणलेल्या माणसाने म्हटलेले मी आणि लाईन मध्ये उभे राहिलेल्या लोकांनी ऐकले. त्याला बघितल्याखेरीज  माझे  काही समाधान होणार नाही असा विचार माझ्या मनात यायच्या आधीच एकाने स्व-उमेदवारी जाहीर करत ‘भ’ अक्षराने सुरु होत असलेल्या किमान ५-६ विशेषणांनी त्या गुलाब जाम खाणाऱ्याला सन्मानित केले.

जरावेळाने लाईनीत थांबलेल्या लोकांना टेबल मिळायला सुरवात झाली आणि मग ते चैतन्याचे वातावरण पुन्हा रजू होऊ लागले. मागून एका तरुणाचा आवाज ऐकू आला. “अरे यार यहापे बहुत टाईम लगने वाला है, एक काम करते है कही दुसरी जगह जाते है”. या त्याच्या वाक्याला एकदम पुणेरी उत्तर मिळाले. त्याच्या बरोबर असलेली त्याची मैत्रीण जी पुण्याचीच होतो, ती म्हणाली “अरे ये लाईन कुछभी नही है. हमारे वेशाली मे ये लाईन सिर्फ एक ट्रेलर है, अरे इतने देर तक रुकना पडता है की बोल मत, और हम रुक्त हे, ऐसा कलटी नही मारते. चल तब तक ये बडीशेप की गोळी खाते है”. तिचा पुण्याच्या जाज्वल्य अभिमान, तिचे ते टिपिकल पुणेरी हिंदी, त्यातून ‘चल तब तक ये बडीशेप की गोळी खाते है’ मधून बाहेर येणारा पुणेरीपणा, असे ते सगळे ऐकून माझ्यात थोडी उर्जा आली होती. मनातल्या मनात मीच माझ्या पाठीवर थाप देत म्हणालो “ आहे..कोणीतरी आपल्यातले आहे”. पण मग त्याचबरोबर ‘वेशाली’ हा शब्द आठवला आणि डोक्यात एक तिडीक भरली. “अरे हे मराठी लोक सुधा ‘वेशाली’ का म्हणतात?” आणि त्यातून पुण्याची, चांगली, सुंदर मराठी मुलगी(अर्थात मी मागे वळून तिचा चेहरा पहिला नव्हता, पण आवाजावरून अंदाज बांधला, तशी सुंदरच असणार ती) आणि तिच्या तोंडून ‘वेशाली’? नाही, विषयच संपला. आज माझ्या फोन मध्ये तो ‘अब तक छप्पन’ मधला नानाचा डायलोग असता तर मी तो फुल वोल्युम मध्ये त्याच क्षणी लावला असता, असा एक क्रांतिकारी विचार माझ्या मनात बराच वेळ ठक-ठक करत होता.

हळू हळू मी लाईनीत पुढे जात होतो. समोर बसलेला गुलाब जाम वीर अजूनही गुलाब जाम खाण्यात मग्न होता. काही वेळाने गुलाब जामाशी खेळायला देखील सुरुवात झाली होती. वाटीतला एक गुलाब जाम त्याने अर्धा केला, त्यानंतर तो त्याने पुन्हा पाकात बुडवला आणि इतके करून सुद्धा खाल्लाच नाही. त्याच्याकडे फक्त बघत बसला होता. त्याचवेळी दुसरा हात पोटावरून फिरवत कदाचित त्याने त्त्याच्या पोटात कितपत जागा आहे हे चेक केले. शेवटी त्याची बायको टेबलावरून उठली आणि तिची पर्स हातात घेतली. स्वाभाविकपणे ह्याला उठावेच लागले, पण ते टेबल आणि तो गुलाब जाम त्याला सोडवतच नव्हते. तसाच पडलेला चेहरा ठेऊन तो उठला आणि एकदाचा गेला आणि मग मला बसायला जागा मिळाली. सुटकेचा निश्वास!

कसे असते बघा, काही गोष्टी एकदम ओटोमेटीक सुचतात. मला कधी-कधी नवलच वाटते या बद्दल. तसा अलिखित नियमच म्हणा, सगळ्यात पहिले मी खुर्चीवर माझा स्कार्फ टाकला म्हणजे कसे ‘हे टेबल आधीच राखीव आहे’ असा बोर्ड त्यावर लागतो. स्कार्फ ठेवून थेट जेवणाचे ताट हातात घेतले. २ बटाटे वडे, वाटीभर मिसळ, २ जोडी पाव (विदाउट बटर, बटरवाले पाव ते पाव भाजीचे असा माझ्या मनात मीच बिंबवून घेतले आहे) आणि श्रीखंड (पहिल्यांदाच? असा ज्यांना प्रश्न पडला असेल त्यांना मी ‘हो!’ एवढेच उत्तर देऊ इच्छितो), असे सगळे घेऊन मी बसलो आणि त्या अन्नाचा आस्वाद घ्यायला मी शुभारंभ केला. जग जिंकल्याचे फिलिंग!   सर्वात पहिले वडा घशात गेला आणि सुख काय असते ते पुन्हा एकदा अनुभवले. त्यानंतर मिसळीचा नंबर होता. अपेक्षे प्रमाणे मिसळ एकदम फक्कड होती. बोस्टन मध्ये अस्सल मराठमोळी मिसळ! वाः,कमाल, बेस, खराब असे अलंकारित शब्द देखील फिके पडत होते. कुठून तरी ‘एक घास चिऊचा, एक घास काउचा आणि एक घाssssssss आमच्या पिल्लूचा” असे शब्द कानावर पडत होते, पण ते फक्त पडतच होते. माझी मान, माझे डोके, माझे डोळे, माझे तोंड, माझे हात, एकूणच माझे पूर्ण लक्ष टेबल वर ठेवलेल्या ताटात होते. कानाचे कसे आहे की ते एकंदर जागे असतात, इकडचे तिकडचे ऐकायची त्यांना सवय आहे.

सेकंड राउंड साठी मी उठलो पण यंदा मात्र मिसळ, २ पाव आणि श्रीखंड एवढेच परत घेऊन आलो. तेवढ्यात पुन्हा एकदा “अरे अथर्व, हे बघ don’t stand and eat, इकडे बस and then eat nicely. अथर्व, ए अथर्व are you listening, मी काय सांगत आहे?”. हा तोच ‘एक घास चिऊ” वाला आवाज होता. आता मात्र मी आवाजाच्या दिशेने पहिले, पाहावेच लागले कारण ते ऐकू आलेले वाक्यच तसे होते. अथर्वची आई अगदी टिपिकल होती. जीन्स, गॅपचा हुडी ज्यातून ते अगदी छोटेसे मंगळसूत्र मुद्दाम बाहेर काढले होते आणि कपाळावर टिकली. तितक्यात वेगळ्या सुरातला अजून एका मुलीचा आवाज ऐकू आला. कमी वोल्युम मध्ये बोलणे चालू होते. “हेच, याचमुळे ही मुले इंग्लिश बोलायला लागतात आणि मराठी विसरतात. पालकच जर आपल्या मुलांशी असे बोलत असतील तर मुलांनी तरी विचारावे कोणाला, नाही सांग तू”. माझ्या आतून पुन्हा एकदा तोच आवाज “आहे, खरेच आपल्या सारखे कोणीतरी आहे!“ पुन्हा तिचा आवाज “आणि राज ठाकरे काही बोलला तर त्याला शिव्या घालतात पण मुद्दा काय आहे ते कोणीच बघत नाही, नाही संगच तू बरोबर आहे का नाही?” मी मनातल्या मनात “हो मुली, अगदी बरोबर आहे तुझे. तुझ्या विचारांना १०० पेकी १००. पण कसे आहे ना सध्या मी खाण्यात व्यस्त आहे आणि ते फार महत्वाचे आहे नाहीतर तुझ्या या वाक्याला मी नक्कीच अजून एक वाक्य जोडले असते पण सध्या ते शक्य नाहीये. प्लीज समजून घे”. जरा वेळाने माझे ताट साफ झाले आणि मग शांतपणे खुर्चीला टेकत मी आजूबाजूला एक नजर टाकली. माझ्याच सारखे कैक भुक्कड, खादाड लोक तिथे बसून त्या ‘मुंबई मास्लाल्यावर’ बेधुंद ताव मारत होते. का कोणास ठाऊक पण त्यांच्याकडे बघून मला एक समाधान वाटले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेग-वेगळ्या भाव मुद्रा होत्या पण त्यात एक समान गोष्ट अशी होती की सगळे खूप आनंदात दिसत होते. निम्म्याहून जास्त मराठी लोक परदेशात एका छताखाली एकत्र जेवत आहेत हे फिलिंग थोडे वेगळेच होते. मागच्या बाजूला त्या पुणेरी मुलीचे तिच्या मित्राला “तुम ये चायनीज भेळ ट्राय करो ना, और वो मसाला दूध भी लेके आओगे प्लीज” असे उपदेश कम आदेश कम मागणी चालू होती. मराठी अस्मिता जपणाऱ्या मुलीला बोलता बोलता कदाचित ठसका लागला होता म्हणून तिचा मित्र तिला पाणी शांतपणे प्यायला सांगत होता. ते पाणी पिताना देखील तिला काहीतरी बोलायचे होते पण “अग २ मिनिट शांतपणे श्वास घे आणि मग बोल” असे सांगून तिला शांत करण्याच्या प्रयत्नांत होता. इकडे अथर्वचे अजूनही उभे राहूनच जेवण चालू होते. एका हातात ते अन्न, ज्यातले अर्धे खाली सांडत होते आणि दुसर्या हातात त्याची पाण्याची बाटली आणि ह्याचे लक्ष्य भालतीकडेच आणि त्या अथर्वच्या आईचे भाषेचे नव-नवीन प्रयोग चालूच होते. असे एकंदर नुसते विविध मसाल्यांचे पदार्थ नसून तिथे विविध मसाल्यांचे लोक देखील होते.

 अरे हो, मसाला दूध विसरलोच की. आलोच घेऊन! ;)     

Saturday, November 19, 2011

खरंच, कधी कधी नकळतच.....

मध्यंतरी एका मैत्रिणीचा फोन आला. ऑफिस सुटल्यावर भेटूया म्हणाली. खरतर काही आठवड्यांपासून  मी काही कारणांमुळे बेचैन होतो, अस्वस्थ होतो. मला थोडा एकांत हवा होता आणि त्यामुळे मला कोणालाही भेटण्याची इच्छा नव्हती. पण मला तिला असे तोंडावर नाही म्हणता नाही आले. मी हो म्हणालो आणि तिच्या घरी जायला निघालो. गाडी चालवत असताना देखील मी सारखा त्याच विचारात होतो. आजू-बाजूला काही तरी बघण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे मी त्या विचारातून बाहेर येईन, पण काही केल्या डोळ्या समोर तेच चित्र आणि मनात तेच विचार. नको नको ते विचार डोक्यात येऊन गेले. माझ्या बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे, का जे मला दिसत आहे ते तसेच आहे, ह्या मधला फरक देखील मला कळत नव्हतं. सगळे जग खूप स्वार्थी झाल्या सारखे वाटत होते. पण एवढं सगळं कळूनही ‘का?’ या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नव्हते. 

आज मागे वळून बघितल्यावर असे वाटते की ज्या दिवशी पासून मला थोडे-फार कळायला लागले त्या दिवशी पासून मी सतत या नियतीशी भांडत आलो आहे. अभ्यास, चांगले कॉलेज, परत अभ्यास, अमुक हवं-तमुक हवं, परत अभ्यास, 1st क्लास, चांगली नोकरी, पगार, प्रेम, मित्र, सतत या-ना-त्या गोष्टींकरता या नियतीशी झगडतोय. कधी कधी जे हावे ते मिळवायला खूप कष्ट केले, कधी अगदीच काही नाही केले....पण कशासाठी?.....का?....सालं फिरून फिरून एकच उत्तर मिळाले....सुखा साठी. भांडलो, झगडलो, कष्ट केले, पळवाट शोधली का तर जे करत आहे त्यातून सुख मिळावे आणि परत असे झगडायला लागू नये. सगळे सुखासाठी. कधी ते सुख अनुभवले, कधी नाही. हे सगळं करताना एक गोष्ट मात्र मी नेटाने पाळली की आपल्या सुखासाठी कधी दुसऱ्याला त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली. बाकीच्यांचे सुख कधीच हिरावून नाही घेतले किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला कधी कमी लेखले नाही, न कधी त्याला दुखावले. पण मग तरी माझ्या बाबतीतच असे का?
या ‘का’ चे उत्तरच मी इतके दिवस शोधत होतो आणि त्याच्यातच गुंतलो जात होतो. शेवटी त्या विचारातच गुंतून गेलेलो मी तिच्या घरी पोचलो होतो. थोडा normal व्हायचा प्रयत्न केला आणि तिच्या घराची बेल वाजवली. घरात एक मंद प्रकाश होता आणि जगजीत सिंग यांची गझल ऐकू आली. आत गेल्या गेल्या मी तिला विचारले “काय ग, हे काय...रूम मध्ये मंद प्रकाश, background ला जगजीत सिंग...काय बेत काय आहे?” ती जरा थांबून आणि अडखळत म्हणाली “अरे सहज...मुड आला म्हणून...चहा घेशील ना?” मी होकार दिला खरा पण मला काहीतरी वेगळे वाटले. 

ती चहा घेऊन आली. खूप दिवसांनी ती भेटली होती त्यामुळे बराच वेळ आम्ही गप्पा मारत बसलो होतो. मला ही थोडे बरे वाटत होते. बोलता-बोलता माझ्या एकदम लक्षात आले की तिने बऱ्याच दिवसात काही नवीन लिहले नव्हते. अधून मधून ती लिहीत असते आणि मी वाचत असतो. मी तिला विचारले की हल्ली ती लिहीत का नाहीये. एक क्षण थांबून ती म्हणाली की तिला वेळ मिळत नाहीये. मला ते कारण पटले नाही. तिलाही कदाचित मला तिने दिलेले कारण पटले नाहीये हे कळले. ती म्हणाली की अलीकडे तिच्या आजू-बाजूला खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत, घडल्या आहेत, positive negative दोन्ही, त्यांच्यात ती अडकून गेली आहे. त्यांच्या मुळे ती खूप भाऊक झाली आहे आणि सतत त्याच विचारात असते. त्या विचारातून बाहेर पडता येत नसल्यामुळे तिला काही नवीन लिहायला वेळ मिळत नव्हता.   
तिच्या चेहऱ्याकडे बघून मला कळले की ती खरंच खूप भाऊक झाली होती आणि सतत या ना त्या विचारात असणार. हे मला पटले देखील कारण ती अशी कधीच नव्हती आणि आज अचानक ती म्हटल्या प्रमाणे तिच्यातला झालेला बदल मलाही दिसायला लागला होता. मला कळेना की मी पुढे काही विचारू का नको. जे काही घडले होते त्या बद्दल मला जाणून घ्यायचा तसा काही हक्क नव्हता, पण मग एवढे काय झाले आहे ज्यामुळे तिची मनस्थिती अशी झाली आहे. मी तिच्याकडे पहिले. ती अजूनही समोर कुठेतरी शून्यात बघून विचार करत होती. ती म्हणाली “तुला सांगते माणूस जेव्हा अशा परिस्थितीतून जातो, तो कितीही practical असला ना तरी अशा वेळेस तो खूप philosophical होऊन जातो. सतत विचारात असतो. तो जे काही बघत आहे, वाचत आहे अगदी प्रत्येक गोष्ट तो त्याच्या आयुष्याशी relate करतो.” मला फारसे काही कळत नव्हते पण मला तिला विचारायचे ही नव्हते. माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून  तिने मला जगजीत सिंग यांच्या एका गझलच्या दोन ओळी सांगितल्या.

येही दुनिया है तो फिर ऐसी ये दुनिया क्यूं है....
येही होता है तो आखिर...ये होता क्यूं है?

ती म्हणाली “या दोन ओळीतच हल्ली मी जगत आहे”. मी तिच्याकडे पहिले. तिचे डोळे ओले झाले होते आणि बरंच काही सांगत होते. मी थोडा अंदाज बांधायचा प्रयत्न केला, पण अजून खोलात जाऊन तिला विचारण्याचे धाडस माझ्यात झाले नाही.
मी विषय बदलण्याची प्रयत्न केला, म्हणालो “सोडून दे”. असं मी म्हटल्यावर ती म्हणाली “सगळे हेच म्हणत आहेत, सोडून दे..अरे पण जे घडले त्यात माझी काहीच चूक नव्हती, मग मी का सोडून द्यायचे?” तिच्या बोलण्यात एक सच्चेपणा मला दिसत होता. ती ओघाच्या भरात असं काही बोलून गेली जे मलाही पूर्ण पणे पटले. ती म्हणाली “जगात काही क्षुल्लक लोक सोडले ना तर हल्ली मला सगळेच लोक दगड वाटू लागले आहेत. त्यांना भावना, माणुसकी हे शब्द कदाचित माहित देखील नाहीयेत, त्यामुळे त्यांचा अर्थ कळणे ही दुरची गोष्ट. कदाचित त्यांना दगड म्हणणे ही योग्य नाही कारण दगडाला मारून, फोडून एक वेगळा आकार आपण देऊ शकतो. हे लोक असे आहेत की त्यांना आकार द्यायला गेले तर आपले हाथ झिजतील पण त्यांना काही फरक पडणार नाही. त्यांच्या करता माणूस देखील एक खेळणं आहे. थोडे दिवस एका खेळण्याशी खेळा, काही दिवसानंतर बाजारातून नवीन खेळणं आणा आणि मग त्याच्याशी खेळा आणि तो खेळ तसाच वेग-वेगळ्या खेळण्यांशी चालू ठेवा. तुला सांगते आपण एखादे जुने खेळणं देखील ५-१० दिवसांनी परत कपाटातून काढून थोड्या वेळ त्याच्याशी खेळतो कारण आपले त्याच्याशी थोडा वेळ का होईना एक नातं असते. ह्या लोकांना जर भावना आणि माणुसकीच कळत नसेल तर नातं काय असते हे कसे कळणार!”

हे सगळे ती सांगत असताना मी पूर्ण शांत होतो. मी माझ्याच विचारात परत ओढला जात होतो कारण ती अगदी माझ्याच मनातली वाक्य बोलत होती. मला तिची कळवळ, तिचे दुख्ख कळत असून देखील मी काय बोलावे मला सुचेना. मला तिचे सांत्वन ही करायचे नव्हते. तिलाही कळत होते की मी एकदम शांत, थोडासा अडकल्या सारखा झालो होतो. ती माझ्याकडे बघत म्हणाली “तू बोलू शकतोस, मला समजत आहे की तू थोडा awkward होत् आहेस, पण ठीक आहे तुला जे काही बोलायचे आहे ते तू बोलू शकतोस”. मी तिच्याकडे पहिले आणि म्हणालो “सोडून दे, अर्थात मला माहिती आहे की असे म्हणणे खूप सोपे आहे पण जसे जमेल तसे सोडून द्यायचा प्रयत्न कर......आणि हो सोडून द्यायचे म्हणजे जे काय घडले आहे ते विसरायचे किंवा त्या व्यक्तीला विसरायचे, माफ करायचे किंवा त्यांच्या पासून पळ काढायचा असे नाही. सोडून द्यायचे म्हणजे तो जो वर बसला आहे, जो सगळे उघड्या डोळ्याने पाहत आहे, त्याच्या कडे सोडून द्यायचे. काही निर्णय खरंच त्याच्यावर टाकून द्यायचे, अगदी हक्काने. आपण अशातून मुक्त होयचा प्रयत्न करायचा आणि त्याला ही जबाबदारी सोपवायची. पुढे तो जे करेल ते करेल. एक लक्षात ठेव आपले मन साफ असेल तर आपण जे करतो ते नेहमी योग्य असते. त्यामुळे खरंच सोडून दे.” 
ती माझ्याकडे बघून हसली. ती म्हणाली “खूप जण मला हेच म्हणाले की, सोडून दे हा विचार....जाउदे... पण तुझी सोडून दे मागची philosophy का कोणास ठाऊक खूप खरी वाटत आहे. अर्थात मी असे जरी म्हणत असले तरी मी तुझे बोलणे पटून घेईन असे नाही पण तू जे सांगितले आहेस त्यावर मी विचार करेन असे वाटत आहे.  तुला फारसे काही माहित नसूनही तू मला जास्त काही विचारले नाहीस आणि तरीही तू सगळ्यांसारखे सल्ले नाही दिलेस. सांत्वन नाही केले. बघू, तू सांगितले आहेस तसाही विचार करून बघते. हल्ली सगळे option मी try out करत आहे.”

मी परत घरी जात असताना मी जे काही तिला बोललो ते परत आठवायचा प्रयत्न केला. मी माझ्या नकळत असे काही बोलून गेलो होतो ज्याची मलाही गरज होती. एवढे असून सुद्धा मी अशा दृष्टीकोनातून विचार केला नव्हता. न कधी मी इतका philosophical बोललो होतो न कधी मी तसे काही ऐकले होते. पण तिला धीर देताना मी मलाच धीर देईन गेलो होतो याची जाणीव मला होत् होती. 

कधी कधी खरंच आपण अशा situation मध्ये अडकतो ज्यावेळेस काय बरोबर आणि काय चुकीचे हे आपल्याला कळत नाही. सगळचं खुप धुसर आणि अपूर्ण दिसत असते. अशा वेळेस बरेच जण खूप सल्ले देत असतात आणि सगळ्यांचे म्हणणे आपल्याला योग्य वाटत असते. काही केल्या मनातली तग-मग मात्र थांबत नसते, सगळ्यांना सांगताही येत नसते. सतत “का?” ह्या प्रश्नाचे उत्तर आपण शोधात असतो. सहाजिकच आहे ते, पण अशाच वेळेस ते एखाद्याचे दोन शब्द, एखादी मिठी, पाठीवर थाप पुरेशी असते त्या situation मधून बाहेर पडायला. कधी कधी समोरच्या माणसाकरता स्वतः थोडे philosophical होऊन बघा, अर्थात नुसते व्हायचे म्हणून किंवा एक कर्तव्य म्हणून नाही पण अगदी मनापासून, त्याच्या भल्याकरता. यामुळे जर त्या व्यक्तीला थोडा जरी आधार वाटणार असेल तर तुम्हालाच एक वेगळे समाधान वाटेल आणि कदाचित हे समाधान तुमच्या नकळत तुम्हांला एक वेगळा दृष्टीकोण देऊन जाईल. 

त्या दिवशी ती अस्वस्थ असण्याचे कारण मी तिला विचारले नाही न तिने मला स्पष्ट पणे सांगितले. माझीही साधारण तशीच अवस्था होती पण मी ही काही बोललो नाही. एवढे असून सुद्धा, नंतर तिच्या चेहऱ्यावरचे ते अगदी किंचितसे समाधान देखील मला समाधान कारक वाटले. त्याच समाधानामुळे माझ्यात एक बळ आले आणि मी जे तिला म्हणालो होतो त्याच्या विचारात मी जगायला लागलो. मी त्या असंख्य विचारांच्या जाळ्यातून बाहेर कसा पडलो हे मला कळले देखील नाही.

त्यानंतर एका आठवड्याने तिचा मला offline ping आला “नवीन लेख लिहला आहे...वाच आणि कळव”. तिचा लेख वाचला. लेख वाचताना माझ्या डोळ्यातले पाणी काही केल्या थांबतच नव्हते. अर्थात हे डोळ्यातले पाणी मी पोटभरून, पोट दुखून हसत होतो, म्हणून होते.
 

Tuesday, August 2, 2011

एका लग्नाची...किंबहुना....एका लग्नातली गोष्ट!


चला.......नेमकं ज्यासाठी मी इथे आलो होतो ती वेळ आता जवळ आली आहे ह्या भावनेनेच मी अतोनात खुश झालो होतो. एकीकडे आमची आई आणि आमचे वडील, वधु-वरांना शुभेच्छा देण्याकरता लागलेल्या रांगेत तंबू ठोकून उभे होते आणि इकडे मी या buffet table वर ठेवलेल्या सुंदर-सुंदर महाराष्ट्रीय पदार्थांच्या गर्दीत अगदी हरवून गेलो होतो. कोपऱ्यातल्या आम्रखंडा पासून सुरु करू का नियमाप्रमाणे मसाले-भातापासून सुरु करू हाच प्रश्न मला बराच वेळ पेचात पाडत होता. एकदा वाटले की सरळ दोन वडे आणि तळण ताटात घ्यावं आणि समोरून कोकम सरबत आणून आरामात एका-एका घोटा बरोबर ते चकण्या सारखं खावं. पण म्हटलं नको. माझी नैतिकता थोडी आड आली. तेवढ्यात आईच्या आवाज ऐकला. कोणा एका बाईशी ती बोलत होती. त्या बाई बरोबर एक पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी उभी होती. “अगबाई ही का नमिता” असं आईने म्हटलेले मी ऐकले. नमिता.....नमिता हे नाव मी ऐकले आणि नमिता नावाला शोभतील असे असंख्य चेहरे माझ्या डोळ्यासमोर आले. लगेच मागे वळून पाहिलं. पण ती नमिता का कोण पाठ करून उभी असल्यामुळे तिचा चेहरा मला दिसत नव्हता. मी परत माझी नजर समोरच्या buffet table वर फिरवली. “आरे वाह! केवढी मोठी झाली आहेस तू नमिता” आमची आई. मला आजतागायत कळले नाहीये की हा प्रश्न या आया किंवा तत्सम बायका का विचारतात. नाही, म्हणजे “केवढी मोठी झाली आहेस” याचं नेमकं उत्तर द्यायचं तरी काय? आता बऱ्याच वर्षांनी एखादी व्यक्ती भेटली की ती मोठी झाली असणारच, त्यात या आयांना इतकं आश्चर्य वाटण्यासारखे काय असते हे त्यांनाच ठाऊक.


जाउदे....आता मात्र माझी भूक (खरं तर हवरेपणा) अगदी विकोपाला पोचली होती आणि याला माझ्या पोटातून येणारा गुर-गुरणारा आवाजही साक्ष होता. मी मागे वळून “आई” अशी हाक मारली. तिकडे आई “आरे हो...हा बघा माझा मुलगा ” असं म्हणाली आणि त्या दोन बायांनी मागे वळून पाहिलं. “आईला पण ना नेमकं आत्ताच introduce करायचं होता का? आता अजून १०-१५ मिनिट थांबावे लागणार” या अशा आविर्भावात मी आईकडे आणि त्या बायांकडे पहिले. पण ते भाव आणि माझी ती मुद्रा इतक्या लगेच बदलेल याचा मी विचारही केला नव्हता. तो क्षण मी माझ्या अख्ख्या आयुष्यात विसरू शकेन असं मला वाटत नाही. त्या नामिताने मागे वळून पाहिलं आणि इकडे मी अगदी पुणेरी भाषेत म्हणायचं झालं तर “गार पडलो”.

एखाद्या मासिकाच्या दिवाळी अंकाच्या पहिल्या पानावर असलेल्या सुंदर मुली सारखी ती होती. कदाचित ‘सुंदर’ हा शब्द सुद्धा  तिला पूर्ण पणे न्याय देऊ शकणार नाही. काळे-भोर डोळे, लांब सडक केस, मोरपंखी रंगाचा पंजाबी ड्रेस आणि त्यालाच match होणारी तिची अगदी बारीकशी टिकली. उजव्या हातात साधारण त्याच रंगाची जाडसर बांगडी. फिकट गुलाबी रंगाची Lipstick तिने लावली होती. ती दिसायला खूप गोरीही नव्हती पण तशी सावळीही म्हणता येणार नाही. साधारण पंचविशीतली असावी, पण तिच्या चेहऱ्यावर एक निरागस भाव होता. तिच्या मानेवर डावीकडच्या बाजूला एक तीळ दिसत होता. मी मनातल्या मनात त्या ब्रम्ह देवाला वंदन केले आणि त्याचे आभार मानले. याच क्षणी मला पु.लंच्या हरितात्या मधली “यमी पेक्षा सहापट गोरी” असलेली ती कल्याणच्या राजाची सून देखील डोळ्यासमोर आली. अर्थात ही नमिता यमी पेक्षा सहापट गोरी या category मधली नव्हती. पण तेंव्हा शिवाजी महाराजांनी त्या कल्याणच्या राजाच्या सुनेचे आणि तिच्या सुंदरतेचे ज्या प्रकारे कौतुक केले होते त्याच प्रकारे मी आता या नामितेचे करत होतो,  अर्थात मनातल्या मनात. इथे मी ब्रम्ह देवाबरोबर त्या भवानी मातेचेही आभार मानले (एकदम भवानी माता का? असा ज्यांना प्रश्न पडला असेल त्यांनी पु.लंच ‘हरितात्या’ एकदा जरूर ऐकावे). तेवढ्यात आमच्या आईने एक अत्यंत विधायक कार्य केले “ऐक रे, नमिता आणि तू जेऊन घ्या...आम्ही येतोच...चालेल ना तुला नमिता?”. “हो हो चालेल ना” असं नमिता म्हणाली आणि इकडे माझ्या मनात violin वाजायला लागले. पहिल्यांदा तिचा आवाज ऐकला. परमेश्वर एखाद्याला एवढे सुंदर कसे काय करू शकतो? मी शून्यात जायच्या आधीच नमिता म्हणाली “चल, जायचं ना आपण?”. असं काही विचारल्यावर कोणी नाही म्हणेल का? आणि मी तर नाहीच नाही. आम्ही दोघेही त्या buffet table पाशी गेलो. 


पुढचा प्रवास बऱ्यापैकी शांत होता. कारण असं होतं की जेवताना ती पूर्ण शांत होती, एक शब्दही ती बोलली नाही. मी, ती काहीतरी बोलेल या अपेक्षेने तिच्याकडे बऱ्याच वेळा चोरून बघतही होतो आणि हो माझी ती जेवायची इच्छा किंवा भूक आधी सारखी राहिलीच नव्हती. तेवढ्यात “मठ्यात साखर जरा जास्तच झाली आहे ना?” अचानक समोर येऊन उभी राहिलेली तिची आई माझ्याकडे बघून म्हणाली. कदाचित तिच्या आईला मी नमिता कडे चोरून बघत आहे हे कळले होते. मी आपलं उगाच काहीतरी बोलायचचे म्हणून “हो हो थोडी जास्तच झाली साखर” असं बोलून गेलो आणि उगाच हसतात ना तसं हसलो. आमच्या मातोश्रींनी नको असलेला dialogue मारला. “आरे पण तू मठ्ठा घेतला आहेस कुठे?” असं भोचकपणे म्हणून आमच्या आईने माझी अगदी बोबडी वळवली. मग मी सावरा सावर करत “अग मगाशी मी तिकडे...म्हणजे त्या buffet table वर थोडीशी चव घेतली होती..तशी साखर जास्तच आहे” असं काहीतरी म्हणालो आणि तेवढ्यात ही नमिता हसली. म्हणजेच काय मी काहीही न करता माती खाल्ली होती. आमच्या आईने मगाशी केलेल्या विधायक कार्याची फिट्टमफाट झाली. आमच्या आया आम्हाला(कदाचित मलाच) त्या अवघड situation मध्ये ठेवून निघून गेल्या.

इकडे नमिता अजूनही माझ्या कडे बघून हसतच होती. मला आता खुपच awkward वाटत होत्. पण तेवढ्यात ती म्हणाली “तुम्हा मुलांना ना, अशा situation व्यवस्थित पणे सांभाळता येतच नाहीत, सगळी मुलं इथून-तिथून सारखीच”. मी पेचात पडलो आणि तिच्याकडे त्याच प्रश्नार्थक चेहऱ्याने बघितले. नमिता हसतच म्हणाली “आता निदान माझ्या समोर तरी असा आव आणू नकोस, तू माझ्या कडे चोरून बघत होतास हे आईला कळले होते म्हणून तिने तुला तसं विचारलं”. मी मनातल्या मनात “अरे बापरे..असं होत् होय!”. नमिता “मला सांग, तुला खरंच माहित नाहीये का तुला माहित आहे आणि तू आव आणत आहेस?” मी “म्हणजे?”. ती “म्हणजे आपल्या दोघांना त्यांनी एकटे का सोडले? तुला ह्या लग्नात तुझ्या आईने का आणले हे तुला अजूनही कळले नाहीये? वा!...मला आधी अंदाज होताच पण मग मगाशी तुझी आई भेटल्यावर तिने ज्या पद्धतीने बोलणं सुरु केलं, माझी खात्री पटली...sorry पण एक सांगते, तुझ्या आईले खोटं बोलायला अगदीच जमत नाही...असो...” मी विचारात पडलो. आईने मला लग्नात येणारेस का विचारल्यावर मी स्वतःहून होकार दिला होता, कारण मला लग्नातले जेवण जेवायचे होते. पण असं काही तिचा उद्देश असेल याचा काही अंदाजच नव्हता. नमिता अजूनही माझ्याकडे बघत होती. मी “नाही, मला असं काही असेल असं खरंच माहित नव्हतं...infact आत्ता तू सांगितलास म्हणून माझ्या डोक्यात tube पेटली...आमची आई म्हणजे...solid आहे की...इतकी हुशार असेल असं वाटलं नव्हतं मला”. ती हसली आणि पुन्हा एकदा मी तिच्या कडे बघत बसलो. नमिता “अरे परत तेच...नुसता बघणार आहेस की पुढे काही बोलणार आहेस? त्या क्षणी मला काय बोलायचे ते सुचेनाच कारण तिने एकदम मुद्द्यालाच हाथ घातला होता. “असा शून्यात काय बघत आहेस? हे बघ मला तुझ्या बद्दल सगळी माहिती आहे...गेला आठवडा आमच्या घरात फक्तं तुझचं गुण-गान चालू आहे....तू कुठे असतोस..कुठे काम करतोस, पगार किती, दर weekend ला मित्रांबरोबर दारू पितोस” मी तिचे वाक्य तोडत “दर weekend ला? हे कोणी सांगितलं तुला...कोणी का सांगेना पण हे खोटं आहे..दर weekend ला वगेरे काही नाही.....कधी तरी मित्र जमले की थोडी घेतो....हे मात्र...” असं म्हणेच तोपर्यंत ती पुन्हा हसायला लागली आणि तसच हसता हसता म्हणाली “म्हणजे तू दारू पितोस! Anyways मला काही problem नाहीये पण फक्त तुझ्या तोंडातून ऐकायचे होते” शब्दात पकडून तिने shockच दिल्यासारखं होत् हे. मी चाट पडलो. मुलींनाच हे कसं जमतं हा प्रश्न परत एकदा माझ्या मनात येऊन गेला. आता मात्र ती माझ्याशी दिल खुलास पणे बोलत होती आणि मला ते आवडलं. पहिल्याच भेटीत तिने मला नुसत्या सौंदर्याने नाहीतर तिच्या एकंदर smartness ने impress केले होते. “तु इथे का आला आहेस हे तुला माहित नव्हते म्हणजे माझ्या बद्दलही तुला काहीच माहित नसणार...नाही सहाजिकच आहे” असा तिने टोमणा कम प्रश्न विचारला. मी अर्थातच नकारार्थी मान हलवली आणि मग तिने मला तिच्या बद्दल सगळं सांगितलं. खरंतर तिच्या बोलण्याकडे माझं लक्ष नव्हतं. मी, ती ते ज्या उत्साहाने आणि प्रामाणिकपणे सांगत होती, ते बघत होतो. मी तिचे बोलणे थांबून तिला अगदी सरळ सोट प्रश्न विचारायचे ठरवले. “ते सगळं ठीक आहे..तू एवढं बोलत आहेस...आणि मगाशी जेवताना अगदी शांत, सोज्वळपणे नबोलता जे काही आव आणलास ते आता कुठे गेले? पण ते ही सोड, माझ्या बद्दल तुला सगळं माहित आहे...तुझ्या आईलाही माहित असणार...पण मग पुढे काय? तुझं उत्तर काय आहे?” असं विचारून मी तिच्या चेहऱ्याकडे बघत बसलो. आता ती ही चाट पडली होती. नमिता “उत्तर म्हणजे...एकदम असं direct तोंडावर कसं सांगू?” मी “का? त्याला काय झालं? मी माझं उत्तर fix केले  आहे!” नमिता “काय आहे तुझे उत्तर?” “म्हणजे, मी उत्तर दिल्यावर तू ठरवणार का? हे बरे जमते तुम्हाला....तु अजून काही ठरवले नसले तर ठीक आहे...take your time…मी माझं उत्तर माझ्या आईला सांगतो...मग ते काय करायचे ते करतील..ok?” असं मी म्हणालो आणि आई कडे गेलो आणि मला सगळं कळलं आहे असं तिला सांगितलं आणि नमिता पसंत आहे असंही सांगितलं. तिकडे नमिता आमच्याकडे लांबून पारख ठेवून होती. शेवटी मी तिकडून बाहेर पडायच्या आधी नमिता कडे एक नजर टाकली. ती ही माझ्याकडे बघत होती..आता ती थोडी सावध झाली होती आणि एका प्रश्नार्थक चेहऱ्याने ती माझ्याकडे बघत होती. मी तिच्या कडे बघून हसलो आणि ह्या हसण्याचा अर्थ तिला ही कळला होता.

पुढे काही दिवसांनी, त्या वर्षीच्या दिवाळीच्या आधी हा दिवाळी अंक आमच्या घरात येऊन आमच्यातला झालेला होता.

Sunday, July 10, 2011

आज, अभिमान बाळगावा? का? कशाचा?

मागे एकदा Dr. A. P. J. Abdul Kalam यांनी त्यांच्या एका लेखात लिहिलं होत् की ‘भारतीय लोकांना आपल्या देशाप्रति जेवढा आपलेपणा, प्रेम आणि अभिमान असायला हवा तेवढा नाहीये’. इतकच नाही तर त्यांनी या करता काही उदाहरण देखील दिली होती ज्यात त्यांनी प्रेम, आपलेपणा आणि अभिमान जागरूक करण्याकरता काही मुद्दे मांडले होते. त्यातील एक मुद्दा असा होता की, सर्वात पहिले वर्तमानपत्रात पहिल्या पानावर कोणत्याही वाईट किंवा negative बातम्या छापणे थांबवावे.  Dr. Kalam असं म्हणतात की गेले अनेक वर्ष पाहिल्या पानावर चोऱ्या, खून, बलात्कार, अपघात, दारू पिऊन दंगा, लाच घेणे अश्याच बातम्या छापल्या जातात. या उलट मुद्दामून, ठरवून चांगल्या आणि positive बातम्या छापल्या तर लोकांमध्ये देशाबद्दल एक चांगुलपणा येईल. त्यांनी मांडलेला हा मुद्दा अगदी वाखाणण्याजोगा आहे. आपल्याकडे बरेच लोक असे आहेत, ज्यांना मनापासून आपल्या देशा बद्दल प्रेम आणि अभिमान हा असतोच, पण कालांतराने त्यांना या गोष्टींचा विसर पडतो. त्यामुळे ती भावना जागरूक करायला, त्यांना सतत या ना त्या परीने जाणीव करून देणे हे गरजेचे आहे. अर्थात अशी भावना जागरूक करून द्यायला लागूच नये. पण काहीतरी चांगला होण्याकरता काही गोष्टी मुद्दामूनच सांगाव्या लागतात त्यातलाच हा एक भाग. सतत काहीतरी चांगलं वाचण्यात आणि ऐकण्यात येत आहे आणि ते ही आपल्या देशाबद्दल आहे, ह्यामुळे निदान काही टक्के लोकांचा दृष्टिकोन तरी बदलेल, अशी अपेक्षा करणं काही चुकीचं नाहीये.

पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर आज बोटावर मोजण्या इतक्या बातम्या असतील ज्या वाचून आपल्याला  आपल्या देशाबद्दल अभिमान वाटेल. त्यामुळे पहिल्या पानावर ठरवून सुद्धा सगळ्या positive बातम्या छापायच्या म्हटलं तरी छापता येणार नाहीत. नको त्या बातम्यांचं प्रमाण इतकं आहे की सगळ्या लोकांना ते पूर्णपणे कळणे हे देखील गरजेचे झाले आहे. लोकांना जर 2G घोटाळ्याबद्दल कळालचं नसतं तर कदाचित तो गैरव्यवहार अजूनही वाढला असता. तिकडे आदर्श घोटाळा बाहेर आला नसता तर तो लोकांना कळणार कसा? जेसिका लाल हत्याकांड, नितीश कटारा हत्याकांड, अगदी अलीकडील जन-लोकमत बिल आज जर लोकांपर्यंत पोचलं नसतं तर ह्या सगळ्यांना न्याय मिळाला असता का?

त्यामुळे आजच्या परिस्थितीसाठी Dr. Kalam यांनी मांडलेला हा मुद्दा थोडा बदलावा लागेल. वर्तमान पत्रात पहिल्या पानावर जरी काही वाईट किंवा negative बातम्या छापून येत असतील तरी त्यात काही गैर नाही. पण सगळ्या लोकांना, आपल्या देशात जे-जे काही वाईट आणि विचित्र कारभार चालू आहेत ते मात्र कळायलाच हवे. कदाचित त्यामुळेच लोकं जास्तं जागरूक होतील.

तुम्ही म्हणाल की त्या देशाबद्दलच्या अभिमानाचं काय? मी म्हणेन की अभिमान हा असा उगाचच येत नसतो किंवा मुद्दामून तयार नसतो करता येत. एखाद्या गोष्टीबद्दल अभिमान वाटण्याकरता काहीतरी करावं किंवा घडवावं लागतं. अगदी छोटं उदाहरण आहे. आपण बघत असतो, वाचत असतो की तिकडे बाकीच्या पाश्चात्य देशात प्रगती इतकी मोठ्या प्रमाणात होत् आहे. 2G सोडा तिकडे आता 4G लोकांच्या दाराशी आलं आहे. आपल्याकडेही अशी नव-नवीन तंत्रज्ञान नक्की आमलात आणता येतील आणि आमलात येत देखील आहेत. आणि तसं जर होत असेल तर आपले लोकं Dr. Kalam म्हणतात त्या प्रमाणे पाश्चात्य देशांकडे नबघता आपल्याच देशाकडे अभिमानाने पाहतील. पण मग मला सांगा ज्या गोष्टीमुळे अभिमान वाढावा त्याचं गोष्टींमध्ये जर घोटाळे व्हायला लागले तर लोकांनी देशाबद्दल अभिमान वाटून घ्यावा का?

इजिप्त, बहारीन आणि लिबिया मध्ये चालू असलेल्या हुकुमशाहीला आपलं सरकार जाहीर पणे विरोध करत आहे. पण आपल्या देशात सुद्धा काही वेगळं चित्र आहे अशातला भाग नाहीये. आपण सगळे अगदी मान वर करून आपल्या सैन्याचा अभिमान बाळगतो. तिकडे सरकार सैन्यात भरती होण्याकरता खूप प्रमाणत प्रोत्साहन पण करत आहे. पण त्याच सैनिकांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांमध्ये घोटाळे होत् आहेत. एवढाच नव्हे तर त्यांच्या करता तयार केल्या गेलेल्या शवपेटिका, यात सुद्धा गैर-व्यवहार झाले आहेत आणि गैर-व्यवहार करतात कोण तर हेच जे देश चालवत आहे. आपल्याकडे लोकशाहीच्या नावाखाली हुकुशाहीच चालू आहे असं म्हटलं तरी आज खोटं नाही ठरणार. जे राज्य करत आहेत तेच नियम बनवत आहेत, आणि जे घोटाळे करत आहेत तेच राज्य करत आहेत आणि त्यांची सावरा-सावरा करायला अजून वेगळे नियम-कायदे केले जात आहेत. ही अशी दुटप्पी भूमीका जर आपणच निवडून दिलेले ते राज्यकरते घेत असतील तर अभिमान येईलच कसा? स्वाभाविक पणे आपल्याच देशाबद्दल लोकांच्या मनात लाज आणि द्वेष निर्माण होण्याशिवाय राहणार नाही आणि त्यात काही गैरही नाही.

ह्यावर बरेच लोकं नेहमी म्हणतात “सामान्य माणसाने पाउल उचलायला हवं, त्याने अमुक करायला हवं, त्याने तमुक करायला हवं”. काहीही झालं की नेहमी सामान्य माणूस. अरे सामान्य माणूस का पाउल उचलेल? मी म्हणेन की सामान्य माणूस हा असाच असतो, तो सगळं चित्र उघड्या डोळ्याने बघत असतो, त्याची टीका करत असतो किंवा त्यांना बोटं दाखवत असतो कारण तो सामान्य माणूस आहे. त्याला त्या पुढे काही करता येत नसतं आणि आपल्या देशात हेच सत्य आहे. सामान्य माणसाला जगा समोर काहीतरी करून दाखवायला थोडं तरी पाठबळ लागतं जे खूप कमी लोकांना लाभतं. त्यामुळे सामान्य माणसाने काहीतरी करून दाखवावे ही अपेक्षाच चुकीची आहे.

पण हे ही इतकंच खरं आहे की एवढं सगळं असूनही मला आणि माझ्या सारख्या अनेकांना भारता बद्दल अभिमान आहे आणि तो नेहमीच असणार. ज्या लोकांना अभिमान नाहीय त्यांनी तो जागरूक करायला निदान एकदा एक प्रयत्न तरी करायला हवा. आपल्या देशा बद्दलचा अभिमान जागरूक करायला काही मोजकी लोकं आज आपल्याच समोर आहेत, त्यांच्याकडे बघा. Dr. Kalam, Dr. Prakash Amte अगदी साधी सोपं उदाहरण घ्यायचा झालं तर आपल्या देशाचं सैन्य, ज्यांना सगळी सत्य परिस्थिती माहित असून सुद्धा ते आपल्या देशाकरता रात्रंदिवस झटत आहेत. कसं आहे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आपण जर चांगल्या बाजूला राहून, समोरच्या बाजूकडे एक बारीकसे लक्ष्य ठेवून, काय चांगलं आणि काय वाईट यातला फरक समजून घेतला तर कुठल्याही गोष्टींचे मोज-माप करायला सोपं जातं.

Practically बोलायचं झालं तर आज आपल्या मध्ये कोणी Bhagat Singh, Sukhdev किंवा Rajguru नाहीये आणि कोणी तसे तयार होतील असंही म्हणता येणार नाही. त्यामुळे आपण काय करू शकतो तर जे-जे काही वाईट आहे त्याला वाईट म्हणणे. जे-जे चुकीचं आहे त्याला ठामपणे चूक म्हणणे. आप-आपल्या परीने जे चुकीचे आहे त्याचा विरोध करणे. तो विरोध ह्या अशा माध्यमातून व्यक्त करणे. चांगल्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देखाबद्दल चा अभिमान टिकवून ठेवणे आणि एक सकारात्मक दृष्टीकोन ठेवून चांगल्याची अपेक्षा करणे.

Tuesday, May 3, 2011

Mother Tongue चे आधुनिकीकरण.....एक चित्र डोळ्या समोर आणा आणि मला सांगा की त्यातून तुम्हांला काय समजलं. चित्र असं आहे की सदाशिव पेठेत दोन मुली आपआपल्या गाड्यांवर बसून गप्पा मारत आहेत. एका मुलीचे नाव केतकी गोखले आणि दुसरी पूर्वा जोशी. अगं पूर्वे that day I was sitting in Vaishali आणि हा अमित suddenly walks in  म्हणजे एकदम असा माझ्या समोर येऊन उभा...I was की नाही so surprised you can’t even imagine गोखले बाई. “आई शप्पथ! then? I mean how was it…म्हणजे you would have been अगदीच हवेत ना?” जोशी काकू. Actually पूर्वे..actually…त्या Esquare च्या movie नंतर, I thought he would never ever meet me….but भारी ना!” गोखले बाई.

तुमच्या डोळ्या समोर जे चित्र उभं राहिलं त्यात तुम्ही, त्या मुली कशा असतील याचा विचार केला असेल हे नक्की.....साधारणपणे एक मुलगी कोथरूड सारख्या भागात राहणारी आणि दुसरी डेक्कन मध्ये राहणारी असेल. दोघेही अगदी चांगल्या मराठी कुटुंबात वाढलेल्या असणार, साधारण माध्यम वर्गीय. अगदी, मुलींचा चेहरा आणि त्यांचे एकंदर कपडे जर डोळ्या समोर आले असतील तर तुम्ही म्हणाल की एक फर्गुसनची असेल आणि दुसरी एस-पी किंवा गरवारेची. हे सगळं म्हणजे, एकंदर त्यांच्या बाह्य रूपावरून आणि बोलण्यावरून तुम्ही केलेले त्या दोन मुलीचं वर्णन. पण मला त्या मुलींच वर्णन किंवा त्याचं चरित्र-चित्रण अपेक्षित नाहीये. मला अपेक्षित आहे एक निष्कर्ष आणि तो निष्कर्ष असा आहे की “ हे आहे आजचं पुणं.”

असं म्हणतात की पुण्यात बोलली जाणारी मराठी भाषा म्हणजे अगदी खरी, अस्सल, अचूक आणि एकदम शुद्ध मराठी भाषा. वरील संभाषण ऐकल्यावर आपल्याला असं म्हणावं लागेल की कधी-काळी पुण्यात बोलली जाणारी मराठी भाषा ही खरी, अस्सल, अचूक आणि एकदम शुद्ध मराठी भाषा होती. आज ती  मराठी नसून Minglish जास्त आहे आणि कारण तुमच्या समोरच आहे, वरील संभाषण.

आज पाहिलं गेलं तर दहा तरुण मुलं-मुलींपेकी किमान सात मुलं-मुली वरील संभाषण जसं आहे अगदी तशाच भाषेत बोलत असतात. त्यांच्या बोली भाषेत दर दोन मराठी शब्दानंतर चार-पाच English शब्द हे येतातच आणि महत्वाचं म्हणजे त्यात त्यांना काही गैर किंवा चूकही वाटत नसते. कारण: त्यांना त्याची सवयच झालेली असते. या सवयीचं मला उमगलेलं एक महत्त्वाचं कारण देखील आहे. हल्ली शाळेतून कॉलेजात गेल्यावर आपण खूप modern आहोत हे सगळ्या मुला-मुलींना (खास करून मुलींना)सगळ्यांना दाखवायचं हे असतंच. ह्या करता नुसतं पोशाक किंवा कॉलेज पूरक नसतं. त्यात भर पडते English बोलण्याची, English मालिका, सिनेमे बघण्याची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे English गाणी ऐकून ती सतत पाठ करून म्हणत बसणे. आणि ह्या सगळ्याची सवय इतकी लागते की खरी किंवा शुद्ध मराठी भाषा काय असते हेच त्या मुला-मुलींना माहित नसतं.

याहून आश्चर्य वाटणारी बाब ही आहे की दररोज आपण हे असं चित्र बघत असतो पण तरीही कोणालाही काहीच खुपत नाही. अशा प्रकारे बोलल्या जाणऱ्या मराठीला सुधारण्यासाठी, कोणी काही करतही नाही. मुलं सर्रास आपआपसात या minglish मध्ये बोलत असतातच, पण स्वतःच्या घरी देखील ते आपआपल्या आई-वडलांशी याच Minglish मध्ये बोलत असतात. आणि आई-वडील देखील त्यांच्या मुलांच्या या अशा भाषेला विरोध करत नाहीत. आपली मुलं या आधुनिक जगात शिक्षित आणि प्रगत व्हावीत हे सगळ्या पालकांना सहाजिकच वाटत असतं. पण या नादात या आपल्या मराठी भाषे कडे खूप प्रमाणत दुर्लक्ष होत् आहे हे त्यांना जाणवत नाही हे बघून मला त्या पालकांची कीव येते. बर त्या मुलांना त्यांच्या या अशा बोलण्याबद्दल सांगायला गेलं तर आपणच वेडे ठरतो. “ अरे चालते रे, एवढा काही फरक पडत नाही आणि तसंही मराठीतून  बोललो काय आणि हे असं बोललो काय..end result एकच ना...मग chill….हे असं बोलणं आज-कालची पद्धत आहे रे “ असं उद्धट उत्तर आपल्याला ऐकावं लागतं.

आज ही परिस्थिती नुसत्या पुण्यातच आढळून येते असं नाहीये. सगळ्या मोठ्या शहरात बोलल्या जाणाऱ्या मातृभाषेला एक दुय्यम स्थान मिळालं आहे जे अत्यंत लाजिरवाणी आहे. मला हेही तेवढंच पटत् की आजच्या जगात प्रत्येक माणसाला English मध्ये अगदी व्यवस्थित बोलता हे आलचं पाहिजे. ती आजची गरजही आहे आणि English ही जगाची भाषा आहे. पण हेही तितकंच खरं आहे की आपण आपल्या मातृभाषेला English पेक्षा कमी लेखून अनादर करू नये, किंवा दुर्लक्षही करू नये. उगाच जगाला आपण किती प्रगत आहोत, किंवा किती “Modern” आहोत हे दाखवण्याकरता अशा Minglish भाषेत जर आपण बोलत असलो तर त्याला काही अर्थ नाहीये. तो निव्वळ वेगळं चेहरा चढवण्यासारखं किंवा मुद्दाम आव आणण्यासारखं आहे.

आज एखाद्या English medium मधील मुला-मुलीला त्यांची मातृभाषा काय आहे हे विचारा, उत्तर न मिळता एक प्रश्न तुम्हांला समोरून ऐकू येईल की “मातृभाषा म्हणजे काय?”....मग त्यांना विचार की “तुझी Mother tongue काय आहे?” आणि मग लगेच उत्तर मिळेल.